आम्ही ब्लू प्रिंट दाखवली, भाजपवाले ब्लूफिल्म दाखवून लढताय -राज ठाकरे

आम्ही ब्लू प्रिंट दाखवली, भाजपवाले ब्लूफिल्म दाखवून लढताय -राज ठाकरे

राज्य विभागून जर समृद्धी महामार्ग उभारणार असाल तर समृद्धी महामार्ग तोडून टाकेन असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

  • Share this:

18 नोव्हेंबर : इथं सभा घेतली की सायलन्स झोन, मैदानात सभा घेतली तर परवानगी नाही, मग सभा घ्यायची तर कुठे ?, हे सरकार इतकं घोच्यू असेल असं वाटलं नव्हतं अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. तसंच  आम्ही विधानसभा निवडणूक ब्लू प्रिट दाखवून लढवली आणि आज भाजप सरकार गुजरातची निवडणूक ब्लू फिल्म दाखवून लढतोय असा सणसणीत टोला राज ठाकरेंनी लगावला. त्याचबरोबर राज्य विभागून जर समृद्धी महामार्ग उभारणार असाल तर समृद्धी महामार्ग तोडून टाकेन असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

ठाण्यात सभेला परवानगी नाकारल्यानंतर अखेर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गडकरी रंगयातन मार्गावर विराट अशी सभा पार पडली. सभेला परवानगी नाकारणाऱ्या ठाण्यातील पोलीस आयुक्त आणि राज्य सरकारवर राज ठाकरेंनी सडकून टीका केली.

' फडणवीस  सरकार घोच्यू, बिनडोकं"

माझी सभा सुरू झाली की लगेच केबलची लाईट घालवली जाते. आताही ठाण्यात सभा सुरू झाली आणि काही ठिकाणी लाईट गेली आहे. सरकारने किती डरफोक असावं याची ही पावती आहे. हिंमत नाही तुमची सभा दाखवण्याची ?, हे सरकार इतकं घोच्यू, बिनडोकं आहे असं वाटलं नव्हतं. त्यांना इतकंही कळत नाही. की नंतर नेटवर व्हिडिओ पाहता येतो असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

हार्दिक पटेलची सीडी काढणारे आंबटशौकीन

आम्ही विधानसभा निवडणूक ब्लू प्रिट दाखवून लढवली आणि आज भाजप सरकार गुजरातची निवडणूक ब्लू फिल्म दाखवून करतोय. हार्दिक पटेलच्या सेक्स सीडीचे व्हिडिओ दाखवले जात आहे. त्याचं आयुष्य आहे तो काय जगेल त्याला ठरवून द्या ना, तुम्ही का दरवाज्याच्या फटीतून बघताय. हे असेल शौक फक्त आंबटशौकीन असतात. या विषयावर तुम्ही निवडणुका लढवताय असा टोला राज ठाकरेंनी भाजपला लगावला.

"राहुल गांधींना का घाबरलात?"

राहुल गांधींना पप्पू म्हणताय, मग राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये सभांचा धडाका लावलाय. ते पाहुन अख्खं भाजप गुजरातमध्ये उतरलं. पंतप्रधान मोदी सारखे दौरे करत आहे. राहुल गांधींना पप्पू म्हणताय तर तुम्ही इतके का घाबरले असा सणसणीत टोला राज ठाकरेंना भाजपला लगावला.

"आम्हीपण 200 कोटींचे दावे ठोकू"

आमचा कार्यकर्ता अविनाश जाधववर जामिनासाठी 1 कोटींचा दावा ठोकलाय. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना बाळा नांदगावकर जेव्हा भेटायला गेले होते तेव्हा कुणाची किती औकात हे ठरवून मी दावा ठोकणार असं उत्तर दिलं. एवढी कसली गुर्मी ?, परमवीर सिंग मधला छत्तीसगढ जागा झाला वाटतंय. परमवीर सिंग, जेव्हा तुमच्यावर खटला दाखल होईल ना तेव्हा आम्हीपण 200-400 कोटींचे दावे ठोकून दाखवू असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तसंच परमवीर सिंग यांच्या हिंमत असेल तर पोलिसांवर जेव्हा हल्ले होतात ते थांबवून दाखवा असं आव्हानही राज ठाकरेंनी दिलं.

"आम्ही कोणत्या भाषेत समजून सांगायचं ?"

मनसेनं आंदोलन केलं म्हणून फेरीवाले बाजूला झाले आहे. जे सरकारला जमलं नाही ते माझ्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं. आम्ही कोणतेही आंदोलन हे कायदे मोडून केलं नाही. तरीही आमच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले जात आहे. जर तुम्हाला निवेदनाची, शांततेची भाषा समजत नसेल तर आम्ही कोणत्या भाषेत समजून सांगायचं ? मुंबईत पोलिसांवर हात उचलला गेला तेव्हा आमच्या कार्यकर्त्याने त्याला जाऊन मारलं, मग का नाही पोलिसावर हात उचलणाऱ्यावर 1 कोटीचा दावा ठोकला ? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

नाना आता गप्प का ?

आता सरकारकडून दोन मराठी चित्रपटांना बंदी घातली आहे. त्यावर नाना पाटेकर का बोलत नाही ?, प्रत्येक गोष्टीत ते बिचारे असं म्हणणं बंद करा असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

बुलेट ट्रेनचं कर्ज देशातील नागरिकांनी का फेडायचं ?

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन सुरू करण्याचा मोदींनी घाट घातला. त्यांना दिल्ली -अहमदाबाद का दिसलं नाही. मोदींसाठी आणि गुजरातसाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा हा डाव आहे. पण कर्ज मात्र भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी का फेडायचं ? असंही राज ठाकरे म्हणाले. तुम्ही गुजरातचे पंतप्रधान म्हणून वागू नका, देशाचे पंतप्रधान व्हा असा सल्लावजा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

"महाराष्ट्रातला मुस्लिम जिथे राहतोय तिथे दंगली नाही"

पहिले बांगलादेशी यायचे आता ते कुठून तरी रोहिंग्या यायला लागले. याचा सगळाभार प्रशासनावर पडतो. पण एक गोष्ट राज ठाकरे म्हणून सांगतोय. महाराष्ट्रातला मुस्लिम जिथे राहतोय, तिथे दंगली होत नाही. आणि बाहेरच्या देशातून, राज्यातून आलेले मुस्लिम राज्यात जिथे जिथे मोहले उभे केले तिथे दंगली होतात असा दावा राज ठाकरेंनी केला.

'मराठीची सक्ती करून दाखवा"

मुख्यमंत्री फडणवीस तुम्ही विदर्भाचे आहात मग विदर्भाचा खुशाला विकास करा. पण वेगळं राज्य उभारण्याचं स्वप्न बघून जर समृद्धी महामार्ग उभारणार असाल तर समृद्धी महामार्ग मध्येत तोडून टाकेन असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. तसंच राज्यात मराठी बोलण्याची सक्ती करून दाखवा असं आव्हानही राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं. तसंच आता पुन्हा एकदा मराठी पाट्यांचं आंदोलन करावं लागेल असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

"टोलमुक्त महाराष्ट्र कधी होणार?"

काँग्रेस, सेनेसह सगळे राजकारणी फेरीवाल्यांच्या बाजूने आहे. इथं कुणालाही काही वाटत नाही. आम्ही जेव्हा टोलविरोधात आंदोलन केलं होतं तेव्हा आमच्या आंदोलनानंतर राज्यातील 64 टोल बंद झाले. टोल बंद झाल्यावर मलाच विचारता मांडवली झाली का? मग त्या सेना भाजपला का नाही विचारत की त्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र कधी होणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

"यापुढे बँकामधील मराठी माणसासाठी आंदोलन"

त्याचबरोबर मनसेचं आंदोलन यापुढे बँकांमधील मराठी माणसांसाठी असेल अशी घोषणाही राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरेंची संपूर्ण सभा

First published: November 18, 2017, 8:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading