मुंबई, 29 ऑक्टोबर : मुंबईत मनसे विरुद्ध फेरीवाले हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. मालाडमध्ये फेरीवाल्यांनी हल्ला केलेल्या सुशांत माळवदे याची राज ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय. सुशांत माळवदे यांच्यावरती चारकोपमधल्या ऑस्कर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुशांतची विचारपूस केल्यानंतर राज ठाकरे माध्यमांशी न बोलताच तसेच गाडीत बसून माघारी फिरलेत. त्यामुळे फेरीवाल्यांच्या मुद्यावर इथून नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्रीच मालाड स्टेशन बाहेर फेरीवाल्यांच्या सामानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आणि त्यांना तिथून हुसकावून लावले. काल दुपारी याच मालाड स्टेशनबाहेर फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. तेव्हापासून मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय.
काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय निरुपम यांच्या चिथावणीवरूनच फेरीवाल्यांनी हा हल्ला केल्याचं मनसेनं म्हटलंय. तर दुसरीकडे स्वतः संजय निरुपम यांनीही फेरीवाल्यांच्या या कृत्याचं समर्थन केलंय. पोलिसांनी सरंक्षण न दिल्यानेच फेरीवाल्यांनी स्वसंरक्षणार्थ ही कृती केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे फेरीवाल्यांच्या मुद्यावरून मनसे विरूद्ध संजय निरुपम पुन्हा आमने सामने आलेत. दरम्यान, मालाड फेरीवाले राडा प्रकरणी पोलिसांनी 18 मनसे कार्यकर्ते आणि 4 फेरीवाल्यांना पोलिसांनी अटक केलीय. तर मालाडमध्ये फेरीवाल्यांची विना परवाना सभा घेतल्याबद्दल पोलिसांनी संजय निरुपम यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा