'मोदीमुक्त भारतासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं'

'मोदीमुक्त भारतासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं'

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या पाडवा मेळ्याव्यात केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या पाडवा मेळ्याव्यात केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या खास शैलीत सडकून टीका केली. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती त्यानंतर लोकांनी त्यांना मतं दिलीत. आता गरज मोदीमुक्त भारताची असून त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून देशात काही महिन्यांमध्ये धार्मिक दंगली घडवल्या जातील असा घणाघाती आरोपही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. आपल्या संपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर पूर्णपणे मौन पाळलं.

राज ठाकरेंचे फटकारे...

- महाराष्ट्राचा विचका होत असताना मुख्यमंत्री, अर्थमंत्री गाणी गाण्यात व्यस्त आहेत. हे काही मुख्यमंत्र्यांचं काम नाही. मुख्यमंत्री हे फक्त मॉनिटर आहेत, विद्यार्थ्यांना नाही तर शिक्षकांना आवडणारे.

- देवेंद्र फडणवीस हे लोकांचे नाही तर दिल्लीतून बसवलेले मुख्यमंत्री आहेत. आलेला आदेश फक्त पाळण्याचं काम ते करतात.

- मुंबई मिळू शकली नाही ही गुजराती नेत्यांच्या मनातली सल कायम आहे. त्यामुळं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान सुरू आहे.

- मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंवर सरदार पटेलांचा दबाव होता असं आचार्य अत्र्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय.

- राम मंदिराच्या नावावर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवल्या जातील, त्यामुळं सावध राहा.

- राम मंदिर बांधलच पाहिजे मात्र ते दंगली घडवून नको. गरज पडली तर वर्षभरानंतर मंदिर बांधलं पाहिजे.

- दाऊदला देशात आणण्यासाठी बऱ्याच हालचाली सुरू असून त्याच्याशी बोलणीही सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

- राज यांच्या फटकाऱ्यापासून श्रीदेवीही सुटल्या नाहीत. त्यांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळायला असं कुठलं मोठं काम त्यांनी केलं. मद्यप्राशनामुळं त्यांचा मृत्यू झाला असं असतानाही सरकारी इतमामात का अंत्यसंस्कार केले गेले?

- अक्षय कुमार हा विदेशी नागरिक असून त्याचा पॅडमॅन हा चित्रपट भाजप पुरस्कृत असल्याचा आरोपही त्यांन केला.

- सगळ्या प्रसारमाध्यमांवर भाजपचं नियत्रंण असून मोदी शहांच्या दहशतीखाली सर्वांना काम करावं लागतंय.

- मनसे संपली असं म्हणऱ्यांनी हा मेळावं बघावे म्हणजे त्यांचे डोळे उघडतील.

- मुंबईत मेट्रोच्या नावाखाली मराठी माणसांना देशोधडीला लावण्याचं काम सुरू आहे. परप्रांतियांचा हा डाव हाणून पाडा.

- देशाला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. पहिलं स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालं, दुसरं स्वातंत्र 1977 मध्ये मिळालं तर तिसरं स्वातंत्र्य 2019 मध्ये मिळालं पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2018 08:27 PM IST

ताज्या बातम्या