मुंबई, 4 मार्च : महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर मुंबईत आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसोबतच ठाणे, पालघरमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्कायमेट या संस्थेनं मुंबई आणि परिसरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत होत असलेल्या बदलांमुळे आजारांचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. दिवसा ऊन आणि रात्री गारव्यामुळे मुंबईकर सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, यंदा महाराष्ट्रात दुष्काळ आणि अतिवृष्टीचा धोका शेतकऱ्यांना बसणार नाही, असा अंदाज काही दिवसांपूर्वीच स्कायमेटने वर्तवला आहे. स्कायमेटच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीची शक्यता धुसर असल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही.
मागच्या वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरेसा पाऊस नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. पण यंदा 2019 मध्ये शेतीसाठी पुरेसा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
2019 मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सूर्यप्रकाश चांगला राहिला, ढगाळ वातावारण राहिलं नाही तर मान्सून चांगला जाण्याची शक्यता असल्याचं हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले आहेत.
सूर्यप्रकाश, ढगाळ वातावरण आणि हवेचा दाब या बाबींचा अंदाज घेत यंदा दुष्काळ आणि अतिवृष्टी होणार नसल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. पण तरीहीदेखील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा, पाणी जपून वापरावं त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये आपल्या शेतमालाजी काळजी घ्यावी असा सल्लादेखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
VIDEO : जेव्हा सभागृहात पाडला रामदास आठवले यांच्या चारोळ्यांचा पाऊस