राहुल गांधी वर्षभर सोडणार काँग्रेसचं अध्यक्षपद, हे काम घेणार हाती

राहुल गांधी वर्षभर सोडणार काँग्रेसचं अध्यक्षपद, हे काम घेणार हाती

गांधी घराण्याचे दोन विश्वासू नेते गुलाम नवी आझाद आणि अहमद पटेल यांच्यावर नवा अध्यक्ष शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,17 जून : काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. राहुल गांधी आज आठवडाभराच्या सुट्टीनंतर परत आले आणि त्यांनी लोकसभेत शपथही घेतली. त्यानंतर सायंकाळी काँग्रेसच्या सर्वोच्च कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. मात्र राहुल हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कार्यकारी समितीने मध्यम मार्ग काढला असून राहुल यांनी वर्ष-दीड वर्षांसाठी काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून दूर राहावं असा तोडगा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्या काळात राहुल गांधी देशभर दौरा करणार आहेत.

गांधी घराण्याचे दोन विश्वासू नेते गुलाम नवी आझाद आणि अहमद पटेल यांच्यावर नवा अध्यक्ष शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे दोनही नेते विविध पर्यायांचा विचार करत आहेत. मल्लिकार्जुन खरगे, सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार, अशोक गहलोत यांच्या नावांचा अध्यक्षपदासाठी विचार सुरू असल्याचीही माहिती आहे. मात्र राहुल गांधी अध्यक्षपदावर असताना इतर कुठलेही नेते यासाठी उत्सुक नाहीत अशीही माहिती आहे.

वर्ष-दीड वर्षांच्या काळात कुठल्याही जबाबदारीत न अडकता राहुल गांधी हे देशभर जातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलतील. त्यांचं म्हणणं ऐकून घेतील अशी त्यांची योजना आहे. या काळात ते सरकारच्या चुकांवरही जोरदार हल्लाबोल करण्याची रणनीती आखत आहेत. तर राहुल हे अध्यक्षपदावर नसल्याने सरकारचा फोकस हा त्यांच्यावर न राहता काँग्रेसच्या अध्यक्षांवर राहावा अशीही काँग्रेसची व्युव्हरचना आहे.

लोकसभेच्या पराभवानंतर राहुल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी त्यांना पदावर कायम राहण्याची विनंती केली. मात्र राहुल हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 09:25 PM IST

ताज्या बातम्या