'रोजगार गायब, 15 लाख गायब आणि आता राफेल फाईलदेखील गायब'

'रोजगार गायब, 15 लाख गायब आणि आता राफेल फाईलदेखील गायब'

  • Share this:

नवी दिल्ली, 7 मार्च : राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. गुरुवारी (7 मार्च) राहुल गांधी यांनी राफेल कराराच्या हरवलेल्या फाईलसंदर्भात पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर चौफेर टीका केली.

'...गायब झाले आहे'

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटलं की, 'गायब झाले आहे', ही नवीन ओळ सरकारने शोधून काढली आहे. रोजगार गायब, 15 लाख रूपये गायब आणि आता राफेलची फाईलदेखील गायब झाली आहे.

'चौकीदाराला वाचवण्याचा प्रयत्न'- राहुल गांधी

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्लाबोल करत म्हटलं की, 'हे सर्व प्रयत्न चौकीदाराला वाचवण्यासाठी केले जात आहेत. राफेलची कागदपत्रं गायब झाली आहेत. राफेल कराराची मोदींनी बायपास सर्जरी केली आहे. मोदींच्या राफेल करारामुळेच देशामध्ये राफेल विमान दाखल करण्यास विलंब झाला आहे. यासंदर्भातील पुरावे आम्ही लवकरच देऊ'.

Loading...

पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचं चॅलेंज

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच या प्रकरणाच्या तपासणीचे आदेश का देत नाहीत?. जर त्यांनी काहीही केलेले नाहीय तर मग चौकशीसाठी का घाबरत आहेत?, असे प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी मोदींना आव्हान दिले आहे.









वाचा : धक्कादायक : 'राफेल' ची कागदपत्र चोरीला, सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत किंवा अनधिकृतपणे हाताळण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती महाधिवक्ता के.के वेणुगोपाल यांनी बुधवारी (6 मार्च) सुप्रीम कोर्टात दिली. महाधिवक्त्यांच्या या माहितीने मोठी खळबळ उडाली आहे. 'संरक्षणाबाबतची अशी गुप्त कागदपत्रं समोर आणणं हा गुन्हा आहे. त्यामुळे याबाबतचा तपास सुरू आहे. हे एक संवेदनशील प्रकरण आहे,' असं के.के वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं .

अशी कागदपत्रे कोर्टाने विचारात घेऊ नये, अशी विनंती वेणूगोपाल यांनी कोर्टाला केली होती. मात्र न्यायमूर्तींनी त्यांना चांगलेच फटकारले. बोफोर्सच्या भ्रष्टाचाराच्यावेळीही अशाच कागदपत्रांवरून सुनावणी झाली होती, असंही न्यायालयाने त्यांना सुनावलं. प्रशांत भूषण हे ज्या कागदपत्रांवर विश्वास ठेवतात ते अनाधिकृत आहेत, असा वेणुगोपाल यांचा युक्तिवाद होता.

तर अनधिकृत दस्ताऐवजही विचारात घेतले जातील. ते अनधिकृत आहेत हे कशावरून असंही न्यायालयाने म्हटलं आहे. आम्ही इथे कायद्याचं पालन करायला बसलो आहेत असंही न्यायालयाने सुनावले. या प्रकरणी पुढची सुनावणी 14 मार्चला होणार आहे.दरम्यान, राफेल मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.

नरेंद्र मोदींनी केला भ्रष्टाचार- राहुल गांधी

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप राहुल गांधींनी यापूर्वीही केला आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी कंपनी 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.

आरोपांवर पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर

आमचे सरकारच पहिले राफेल विमान उडवणार, असं 3 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेठीमध्ये म्हटलं आहे. राफेल विमान प्रकरणावरुन काँग्रेसला टार्गेट करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, ही लोक वर्षानुवर्षे राफेल विमानांच्या खरेदी करारावरच अडून बसले होते. जेव्हा सरकार सत्तेतून जाण्याची वेळ आली तेव्हा संबंधित करार बासनात गुंडाळला. मग आमचे सरकार आले आणि दीड वर्षाच्या आतच करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि काही महिन्यांतच देशाच्या शत्रूंना धक्के देण्यासाठी पहिले राफेल विमान आकाशात झेपावणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 09:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...