'अमेठी ही माझी कर्मभूमी पण.... ' राहुल गांधी आणखी कुठून लढणार ?

'अमेठी ही माझी कर्मभूमी पण.... ' राहुल गांधी आणखी कुठून लढणार ?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसोबतच आणखी एका मतदारसंघातून लढणार, अशी चर्चा आहे. राहुल गांधींनीही ही शक्यता फेटाळलेली नाही. अमेठी ही माझी कर्मभूमी आहे पण आणखी एका ठिकाणाहूनही मी लढू शकतो, असं राहुल गांधींनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसोबतच आणखी एका मतदारसंघातून लढणार, अशी चर्चा आहे. राहुल गांधींनीही ही शक्यता फेटाळलेली नाही. अमेठी ही माझी कर्मभूमी आहे पण आणखी एका ठिकाणाहूनही मी लढू शकतो, असं राहुल गांधींनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

प्रियांका गांधी निवडणूक लढवणार का, असं विचारल्यावर ते म्हणाले, निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय प्रियांका गांधीच घेतील. काँग्रेसची उमेदवार यादी अजून पूर्ण व्हायची आहे.

राहुल गांधींसमोर कर्नाटक, तामिळनाडू किंवा केरळमधून लढण्याचा पर्याय आहे. मला त्यांच्या राज्यातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे, असं राहुल गांधींनी या मुलाखतीत सांगितलं.

केरळ की कर्नाटक ?

राहुल गांधी केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत, असं बोललं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांनीही दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली आहे याची राहुल गांधींनी आठवण करून दिली.

२०१४ च्या निवडणुकीत त्यांनी अमेठीमधून स्मृती इराणी यांचा पराभव केला होता. याही वेळी स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात लढत होणार आहे.

भाजपला काँटे की टक्कर देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मैदानात उतरवलं जाणार का, असंही राहुल गांधींना विचारण्यात आलं. त्यावर आम्ही जुन्या आणि नव्या अशा दोन्ही नेत्यांना संधी देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी आपली उमेदवारी कर्नाटक आणि केरळपैकी कुठून जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दोन्ही राज्यातल्या प्रदेश काँग्रेसने त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला आहे. याआधी, सोनिया गांधींनी कर्नाटकमधल्या बेल्लारीमधून निवडणूक लढवली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही कर्नाटकमधल्या चिकमंगळूरमधून लढल्या होत्या.

========================================================================================================================================================

उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 07:59 PM IST

ताज्या बातम्या