नवी दिल्ली, 18 एप्रिल : देशात अत्यंत वेगानं पसरणारा कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) पाहता काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यांनी इतर सर्व नेत्यांनाही आवाहन केलं की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, सर्वांनी प्रचारसभा रद्द कराव्या. (Rahul Gandhi suspended his rallies in west bengal)
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मात्र प्रचंड गर्दीच्या सभा होत आहेत. या सभांवरून विविध स्तरातील लोक राजकीय पक्ष आणि नेत्यांवर टीका करत आहेत. कोरोनाला निवडणुका असलेल्या राज्याचं वावडं आहे का? असा सवाल विचारला जाऊ लागला होता. हजारोंच्या संख्येनं येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रचंड धोका असल्यानं राजकीय पक्षांवर टीका होत होती. मात्र तरीही त्यात फारसा फरक पडला नाही. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या आगामी टप्प्यांसाठी प्रचार ऐन रंगात आलेला आहे. पण असं असतानाही राहुल गांधी यांनी अखेर पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या सर्व सभा रद्द केल्या आहेत.
(वाचा-'कापडी मास्क वापरणं टाळा', डॉक्टरांनी सांगितलं कोरोनापासून कसा करायचा बचाव )
राहुल गांधी यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. कोविडचं संकट पाहता पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं. तसंच अशा संकट काळात या सभांमुळं जनता आणि देशाला किती धोका निर्माण होऊ शकतो, याचा राजकीय पक्षांनी विचार करावा असं आवाहनही राहुल गांधींनी केलं आहे.
कोविड संकट को देखते हुए, मैंने पश्चिम बंगाल की अपनी सभी रैलियाँ रद्द करने का निर्णय लिया है। राजनैतिक दलों को सोचना चाहिए कि ऐसे समय में इन रैलियों से जनता व देश को कितना ख़तरा है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 18, 2021
पश्चिम बंगालमध्ये आणखी तीन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. त्यामुळं याठिकाणी सध्या प्रचारानं वेग पकडल्याचं पाहायला मिळालं आहे. 114 मतदारसंघांमध्ये अजून मतदान व्हायचं आहे. त्यामुळं निवडणुकीतील एक मोठा टप्पा अद्याप बाकी आहे. ममता बॅनर्जी आणि भाजप दोघांनीही याठिकाणी विजयासाठी जंग जंग पछाडलं आहे. अशा स्थितीत कोरोनाचा विचार करून राहुल गांधींप्रमाणे इतरही नेते असा निर्णय घेणार का हे आता पाहावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.