बंगळुरू,ता.19 मे: कर्नाटकात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराचा पराभव झाल्याची बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला.
कर्नाटकमध्ये भाजपने जनादेशाचा अवमान केला आणि केवळ अहंकारापोटी सत्ता स्थापन केली. या खेळीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाची फूस होती. देशातल्या प्रत्येक घटनात्मक संस्थेच खच्चीकरण करण्याची संघाची खेळी आहे. काँग्रेस जेडीएसच्या आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या टेप्स बाहेर आल्या आहेत असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची कशी भाषा करू शकतात असा सवालही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भ्रष्टाचाराचं प्रतिक आहेत असा आरोपही त्यांनी केला. सर्व विरोधी पक्ष मिळून भाजपविरूद्ध संघर्ष करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर येडियुरप्पा आणि भाजपचे आमदार राष्ट्रगितासाठी थांबले नाहीत. त्यांनी राष्ट्रगिताचा अवमान केला अशी टीकाही त्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, B s yeddyurappa, BJP, Congress, Jds, Karanatak election, Karantak election, Narendra modi, Rahul gandhi