राहुल गांधी हे तर जानवं घालणारे हिंदू !- 'बिगर हिंदू' वादावर काँग्रेसचं स्पष्टीकरण

राहुल गांधी हे तर जानवं घालणारे हिंदू !- 'बिगर हिंदू' वादावर काँग्रेसचं स्पष्टीकरण

'राहुल गांधी हे तर जानवं घालणारे हिंदू आहेत, त्यामुळे भाजपने राहुल गांधीच्या धर्माचा उकरून काढलेला हा वाद म्हणजे निव्वळ खालच्या पातळीवरचं राजकारण आहे,'-रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते काँग्रेस

  • Share this:

29 नोव्हेंबर, अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत 'सॉप्ट हिंदुत्वाची' कास धरलेल्या राहुल गांधींना सोमनाथ मंदिरातील बिगर हिंदू रजिस्टरमधील नोंदीमुळे वेगळ्याच वादाचा सामना करावा लागतोय. सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी जाताना काँग्रेसचे कोऑर्डिनेटर मनोज त्यागी यांनी राहुल गांधी आणि अहमद पटेल यांचं नाव बिगर हिंदू रजिस्टरमध्ये टाकल्याने भाजपने त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केलाय. त्यावर काँग्रेसकडून 'राहुल गांधी हे तर जानवं घालणारे हिंदू आहेत, त्यामुळे भाजपने राहुल गांधीच्या धर्माचा उकरून काढलेला हा वाद म्हणजे निव्वळ खालच्या पातळीवरचं राजकारण आहे,' असं स्पष्टीकरण दिलंय.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केलाय. त्यासाठी त्यांनी राहुल गांधींचे, राजीव गांधींना अग्नी देतानाचे जानवं घातलेले फोटो पुरावा म्हणून सादर केलेत. गुजरातमध्ये भाजपकडे विकासाचा मुद्दा नसल्यानेच ते राहुल गांधींच्या धर्माचा वाद उकरून काढताहेत. असंही सुरजेवाला यांनी म्हटलंय.

दरम्यान, गांधी फॅमिलीचे कट्टर विरोधक सुब्रमन्यम स्वामी यांनी राहुल गांधी हे धर्माने ख्रिश्चनच असल्याचा दावा केलाय. त्यासाठी त्यांनी दहा जनपथ नजीक एक चर्च देखील बांधून घेतल्याचा दावा केलाय. राहुल गांधींना ख्रिश्चन म्हणून घेण्यास लाज वाटते का ? अशी मुक्ताफळंही सुब्रमन्यम स्वामी यांनी उधळलीत. दरम्यान, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वतः राहुल गांधी मात्र, मी शिवभक्त असल्याचं म्हटल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलंय.

राहुल गांधी यांचा नेमका धर्म कोणता ?

राहुल गांधी स्वतःला शिवभक्त मानत असले तरी त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रावर धर्माचा उल्लेखच केलेला नाही. पण तरीही त्यांचा धर्म शोधायचा म्हटलं तर आपल्याला गांधी फॅमिलीच्या वंशपरांपरागत धार्मिक इतिहासात डोकावं लागेल. राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी यांच्याशी प्रेमविवाह केला होता. फिरोज गांधी हे पारशी होते. त्यामुळे त्यांचा मूळचा धर्म हा पारशी होतो. पण पुढे राजीव गांधींनी सोनिया गांधींशी प्रेमविवाह केल्याने इथे पुन्हा पारशी आणि रोमन कॅथलिक ख्रिश्चन या दोन धर्माचा मुद्दा उपस्थित होतो. पण या दोघांनी लग्न मात्र आर्यपद्धतीने केलंय. त्यामुळे इथे पुन्हा धर्माचा मुद्दा गौण ठरतोय. पण भारतीय विवाहसंस्था परंपरेत सर्वसाधारणपणे मुलं ही वडिलांचाच धर्म लावतात. पण स्वतः गांधी फॅमिली मात्र, स्वतः हिंदू मानतात. राजीव गांधी याच्या पार्थिवावरही हिंदू पद्धतीनेच अंतिमसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, राहुल गांधीचे पंजोबा म्हणजेच पंडीत नेहरू हे काश्मिरी पंडीत होते. हाच धागा पकडून राहुल गांधी स्वतःला हिंदू मानत असल्याचं बोललं जातंय.

First published: November 29, 2017, 8:14 PM IST

ताज्या बातम्या