नवी दिल्ली, 6 मार्च : संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत किंवा अनधिकृतपणे हाताळण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती महाधिवक्ता के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात दिली आहे. महाधिवक्त्यांच्या या माहितीने मोठी खळबळ उडाली आहे.
'संरक्षणाबाबतची अशी गुप्त कागदपत्र समोर आणणं हा गुन्हा आहे. त्यामुळे याबाबतचा तपास सुरू आहे. हे एक संवेदनशील प्रकरण आहे,' असं के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे.
दरम्यान, राफेल मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
काय आहे राहुल गांधींचा आरोप?
राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी कंपनी 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.
मोदींचं उत्तर
आमचे सरकारच पहिले राफेल विमान उडवणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच म्हटलं आहे. राफेल विमान प्रकरणावरुन काँग्रेसला टार्गेट करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ही लोक वर्षानुवर्षे राफेल विमानांच्या खरेदी करारावरच अडून बसले होते. जेव्हा सरकार सत्तेतून जाण्याची वेळ आली तेव्हा संबंधित करार बासनात गुंडाळला. मग आमचे सरकार आहे आणि दीड वर्षाच्या आतच करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि काही महिन्यांतच देशाच्या शत्रूंना धक्के देण्यासाठी पहिले राफेल विमान आकाशात झेपावणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
VIDEO : देव तारी त्याला कोण मारी! चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला, अन्...