खूशखबर! यंदा बिनधास्त खाता येणार हापूस आंबा; आवक वाढल्याने दर कमी होण्याची शक्यता; ग्राहकांना दिलासा
खूशखबर! यंदा बिनधास्त खाता येणार हापूस आंबा; आवक वाढल्याने दर कमी होण्याची शक्यता; ग्राहकांना दिलासा
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक (Arrival) झाली. मुंबई जवळच्या वाशी भाजीपाला मार्केटमध्ये सुमारे 85 ते 90 हजार आंबा पेट्यांची आवक झाली आहे
मुंबई, 03 मे: हापूस आंबा (Alphonso Mango) म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं. उन्हाळा आणि आंबा हे समीकरण अतूट असं आहे. सध्या आंब्याचा हंगाम (Mango Season) सुरू आहे. अक्षय्य तृतीयेला आंब्याला विशेष महत्त्व असतं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बाजारात आंब्याची आवक कमी होती. परिणामी हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. मे महिन्यात हापूससह अन्य जातीच्या आंब्यांची आवक वाढू शकते, असा अंदाज कृषी विशेषज्ञांनी व्यक्त केला होता. हा अंदाज आता खरा ठरताना दिसत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक (Arrival) झाली. मुंबई जवळच्या वाशी भाजीपाला मार्केटमध्ये सुमारे 85 ते 90 हजार आंबा पेट्यांची आवक झाली आहे. या विषयीचं वृत्त `टीव्ही 9 हिंदी`ने दिलं आहे.
या हंगामाच्या सुरुवातीला प्रतिकूल हवामानामुळे आंबा उत्पादनावर काहीसा परिणाम झाला. अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि वाढत्या उष्म्यामुळे (Heat) यंदा आंबा बाजारात दाखल होईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, अक्षय्य तृतीयेला (3 मे) वाशी भाजीपाला मार्केटमध्ये सुमारे 85 ते 90 हजार आंबा पेट्यांची आवक झाली आहे. आंबा उत्पादक संघाने, मे महिन्याच्या अखेरीपर्यंत हापूस आंबा बाजारात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली होती. परंतु, गेल्या आठ दिवसांत पुणे, मुंबई आणि वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढताना दिसत आहे. अक्षय्य तृतीयेमुळे आंब्याचे दर (Rate) अजून कमी होण्याची शक्यता आहे. या पूर्वी हापूस आंब्याचा दर 1000 ते 1200 रुपये प्रतिपेटी होता. तो आता कमी होऊन 600 ते 800 रुपये प्रतिपेटी झाला आहे. आंब्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कितीही कडक उन्हाळा असला तरी 'हे' फळ फ्रीजमध्ये नका ठेवू , जाणून घ्या कारण
उपलब्ध मालाचा पुरेपूर फायदा व्हावा, यासाठी उत्पादकांनी आपलं गणित तयार केलं होतं. तसंच त्यांनी अक्षय्य तृतीयेदरम्यान आंबा विक्रीची योजनादेखील आखली होती. त्यामुळे मंगळवारी मुंबई बाजारात एकाच दिवशी 85,000 पेटी आंबाआवक झाली. यापैकी बहुतांश आंबा कोकणातून दाखल झाला आहे. वाशी मार्केटमध्ये यंदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधून आंब्याची आवक झाली आहे. तसंच कर्नाटकातूनही आंबा दाखल झाला आहे. `जूनपर्यंत आवकेत आणखी वाढ होईल,` असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
आंब्याचं उत्पादन कमी असल्याने यापूर्वी केवळ मुख्य बाजारातच आंब्याची आवक होत होती. अक्षय्य तृतीयेपर्यंत (Akshaya Tritiya) आंबा बाजारात पोहोचेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. मागील दोन दिवसांपासून आंब्याची आवक वाढली असून, त्यामुळे दरदेखील कमी झाले आहेत. परंतु, यामुळे आंबा उत्पादकांना दर कमी मिळत असले तर सर्वसामान्य नागरिक दर कमी झाल्यानं सुखावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.