लखनऊ, 13 ऑक्टोबर : उ. प्रदेशातील गोंडा येथे तीन अल्पवयीन मुलींवर अॅसिड फेकल्याच्या घटनेचे आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या प्रकरणावरुन थेट योगी सरकारवर टीकास्त्र सोडत राज्यातील अपराध्यांच्या मनोबलात वाढ झाली आहे, अशी टीका केली आहे. गोंडा येथीस परसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दलित कुटुंबांच्या मुलींवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. रात्री घराच्या गच्चीवर झोपलेल्या तीन अल्पवयीन मुलींवर अॅसिड हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात या तिन्ही मुली होरपळल्या आहेत.
या मुलींच्या वडिलांच्या जबाबाच्या बातमी ट्विट करत, प्रियंका यांनी लिहिले हे की, ‘ या व्यक्तीच्या 17, 10 आणि 8 वर्षांच्या तीन मुली घरात झोपल्या होत्या. कुणीतरी घरात शिरले आणि त्यांच्यावर अॅसिड हल्ला केला. महिलांवर अपराध करणाऱ्यांना योग्य ठरविणाऱ्या आणि त्यांचा बचाव करण्याच्या उ. प्रदेश सरकारच्या भूमिकेमुळे राज्यातील अपराध्यांचं मनोबल वाढीस लागले आहे.’
This man’s three daughters aged 17, 10 & 8 were asleep in their home when someone entered and threw acid on them.
The UP government’s politically motivated narrative of justifying and protecting perpetrators of crimes against women has only emboldened criminals across the state. pic.twitter.com/WgThvDlYqB
दुसरीकडे या तिन्ही मुलींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेशकुमार पांड्ये यांनी दिली आहे. फॉरेन्सिक टीमला सोबत घेऊन पोलीस अधिक्षकांनी या मुलींची भेट घेतली. या मुलींच्या सुरक्षेसाठी जळितांच्या वॉर्डमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशास मनी आदेश जारी करण्यात आले आहेत. जे ही दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
कुणासोबतही वैर नव्हते, वडिलांचा जबाब
अॅसिड हल्ल्याची कल्पना नसल्याने सुरुवातीला मुली सिलिंडरच्या आगीत भाजल्या आहेत, असे वाटल्याचे मुलींच्या वडिलांनी सांगितले. मात्र त्यानंतर अज्ञात व्यक्तीने येऊन अॅसिड हल्ला केल्याचे समोर आले, असेही त्यांनी म्हटले आहे. या मुलींच्या वडिलांनी सांगितले की, ‘जेव्हा अंगावर अॅसिड पडले तेव्हा मुली ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकून मी दरवाजा उघडला. मुलींना मांडीवर घेऊन विचारले की सिंलिंडरला आग लागली होती का, त्यावर त्यांनी नाही असे सांगितले.’ कुणावरही संशय नसल्याचेही मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे. गावात आत्तापर्यंत कुणाशीही वैर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.