नवी दिल्ली 26 जानेवारी : काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियांका गांधी भारतात कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रियांका या सध्या अमेरिकेत आपल्या मुलीच्या उपचारासाठी गेल्या आहेत. त्या 1 किंवा 2 फेब्रुवारीला भारतात परतणार आहेत. त्याचं भव्य स्वागत करण्याची काँग्रेस जोरदार तयारी करत आहेत. प्रियांकांचं पदार्पण 'शाही' व्हावं यासाठी कुंभमेळ्याचाही आधार काँग्रेस घेणार आहे.
भारतात परतल्यानंतर 4 फेब्रुवारीला प्रियांका आणि राहुल गांधी लखनऊला जाणार आहेत. तिथे काँग्रेसची मोठी रॅलीही होणार आहे आणि त्या आणि राहुल पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्या काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
त्या आधी प्रियांका आणि राहुल प्रयागराज इथं जाणार असून त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत.
4 फेब्रुवारीला मौनी अमावस्या असून दुसरं शाही स्नान आहे. गंगेच्या संगमावर पवित्र स्नान केल्यानंतर लखनऊत येऊन त्या पत्रकार परिषदही घेणार आहेत. कुंभमेळ्याचं निमित्त साधत सॉफ्ट हिंदुत्वाचं राजकारण अधिक बळकट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
या आधीही विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी देण्याची काळजी घेतली होती. तोच धागा पकडत प्रियांकाही उत्तर प्रदेशातल्या ब्राम्हण मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. या आधी सोनिया गांधी यांनी 2011 मध्ये कुंभमेळ्यात जाऊन स्नान केलं होतं.
वरुण देणार राहुल गांधींना 'हात'
भाजपचे खासदार आणि राहुल गांधी यांचे चुलत भाऊ वरुण गांधी सध्या भाजपमध्ये नाराज आहेत. पक्षात फारसं महत्त्व मिळत नसल्याने त्यांची नाराजी वाढत जातेय. त्यामुळे वरुण हे गेली काही वर्ष भाजपमध्ये फारसे सक्रीय दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकांना आता फक्त चार महिने राहिले आहेत. त्यामुळे नाराज असलेले वरुण गांधी भाजपला धक्का देत काँग्रेसचा हात पकडण्याची शक्यता आहे.
प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. उत्तर प्रदेशात त्यामुळे फायदा काँग्रेला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यातच आता काँग्रेस आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असून वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.