न्यूयॉर्क, ०५ एप्रिल- बिग फॅट वेडिंगनंतर प्रियांका चोप्रा जोनस पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. नुकतीच प्रियांका जोनस ब्रदर्सच्या सकर गाण्यात दिसली होती. हे गाणं युट्युबच्या टॉप चार्टमध्ये होतं. बॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दल बोलायचं झालं तर प्रियांका लवकरच शोनाली बोसच्या द स्काय इज पिंक सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात फरहान अख्तर आणि झायरा वसीमसोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाची निर्मितीही तिनेच केली आहे. सध्या प्रियांका तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्यामुळे तिने पर्पल पेबल पिक्चर्स ही तिची निर्मिती संस्था वाढवण्याचा विचार करत आहे.
प्रियांका ही संस्था फक्त भारतातच नाही तर अमेरिकेतही प्रस्थापित करण्याच्या विचारात आहे. या कामासाठी ती बंबल बीझ या अपच्या संपर्कात आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मद्वारे ती पर्पल पेबल पिक्चर्ससाठी दोन योग्य उमेदवार शोधत आहे. मार्केटिंग असिस्टंट आणि प्रोडक्शन इनटर्न या दोन जागांसाठी ती माणसं शोधत आहे. यातील मार्केटिंगची जागा भारतासाठी असेल तर प्रोडक्शन इनटर्नची जागा अमेरिकेत असेल.
प्रियांका नेमकी कसा उमेदवार हवा आहे याबद्दल सांगताना तिच्या जवळच्या व्यक्तिने म्हटले की, ‘मार्केटिंगसाठी असा माणूस हवा आहे जो भारतात काम करेल आणि त्याला बॉलिवूडबद्दल सर्वकाही माहीत असेल. एक असा उमेदवार जो अक्षरशः बॉलिवूड जगतो, खातो आणि झोपतो. या जागेसाठी मुलगा किंवा मुलगी कोणीही अप्लाय करू शकतात. फक्त अट एकच आहे ते म्हणजे बॉलिवूडबद्दल खडान् खडा माहिती असणं आवश्यक आहे.’
प्रोडक्शन इनटर्नबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘प्रियांकाला या जागेसाठीचा उमेदवार किमान पदवीधर असावा असं वाटतं. तसेच समर इनटर्नही तिला चालणार आहेत, जे सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये येऊन काम करतील. जेणेकरून त्यांचं कॉलेजही बुडणार नाही.’
मग तुम्ही कसला विचार करताय. जर तुम्हाला बॉलिवूडबद्दल इंतभूत माहिती असेल तर लगेच अप्लाय करा. कोणाला माहिती ही नोकरी तुमच्याचसाठी असेल.
VIDEO : आढळराव पाटील आणि गिरीश बापटांच्या भेटीबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...