नाशिकमधील कोरोना चाचण्या करणाऱ्या खासगी लॅबवर प्रशासनाची कारवाई

नाशिकमधील कोरोना चाचण्या करणाऱ्या खासगी लॅबवर प्रशासनाची कारवाई

एकीकडे देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, दुसरीकडे कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्याऱ्या लॅबचा काळाबाजारही वाढला आहे.

  • Share this:

नाशिक, 27 फेब्रुवारी: एकीकडे देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, दुसरीकडे कोरोना विषाणूच्या चाचण्या घेणाऱ्या खासगी  लॅबमधील रिपोर्टमध्ये तफावत आढळून आली आहे.  रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार असल्याचा संशय नाशिक जिल्हा प्रशासनाला आहे. सरकारी आणि खाजगी लॅबमध्ये कोरोना अहवालात मोठ्या प्रमाणात तफावत आढळत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा प्रशासनाने तीन लॅबला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संबंधित लॅबमध्ये कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक असल्याने जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

नाशिकमधील सुप्रीम डायग्नोस्टिक, थायरॉकेयर आणि दातार या तीनही लॅबमध्ये रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. यातील दातार लॅबला योग्य तो खुलासा करेपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन इस्माईल शेख या पीडित व्यक्तीने दातार लॅबमध्ये कोरोना विषाणूची चाचणी केली होती. यावेळी त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल दातार लॅबने दिला. पण त्याची प्रकृती एकदम ठीक असल्याने त्यांचा या अहवालावर विश्वास बसला नाही. दरम्यान, त्यांना काही वैयक्तिक कामासाठी दुबईला जायचं होतं. त्यामुळे त्यांनी आणखी तीन ठिकाणी कोरोनाची चाचणी करून घेतली. त्यानंतर या चाचणीत तफावत असल्याचं लक्षात आलं आहे. या चारही कोरोना अहवालाच्या प्रति न्यूज 18 लोकमतच्या हाती लागल्या आहेत.

हे ही वाचा -मोठी बातमी! खासगी रुग्णालयातही Corona Vaccine; अवघ्या 250 रुपयांत मिळणार एक डोस!

इतर तीन ठिकाणी केलेल्या चाचणीत हुसेन इस्माईल शेख यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर एकट्या लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तिने दुबईमध्ये देखील कोरोना चाचणी केली होती. तिथेही शेख यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे.

दरम्यान,  दातार लॅबने 500 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी, राज्य सरकाच्या आरोग्य मंत्रालयावर  पाचशे कोटी रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दातरा लॅबने दिला आहे.  जिल्हा प्रशासनाने दातार लॅबच्या रिपोर्टवर संशय व्यक्त करत काम बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दातार लॅबच्या नोटीसमुळे राज्य सरकार विरुद्ध खाजगी लॅब संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

Published by: News18 Desk
First published: February 27, 2021, 9:44 PM IST

ताज्या बातम्या