मुंबई, 21 मे: तौत्के चक्रीवादळ (cyclone tauktae) आल्यानंतर कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना त्याचा मोठा फटका बसला. चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणच्या दौऱ्यावर गेलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर बुटांवरून नवाब मलिकांनी टीका (Nawab Malik criticised over shoes) करताच त्यांना प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखे आश्चर्य नाही अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
तोक्ते वादळाने कोकणात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौर्यावर होते. यावेळी प्रसिद्ध झालेल्या फोटोत दोन्ही विरोधी पक्षनेते एकसारखे नवीन बूट घातलेले दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी 'नायकी' चे की 'पूमा' चे बूट घातलेत हे माहीत नाही परंतु फोटोत मात्र एकसारखेच बूट दिसत आहेत असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
नवाब मलिकांच्या टीकेला प्रविण दरेकरांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, "नवाब मलिकांनी आमचे बूट पाहण्यापेक्षा तुम्ही कोकणात जा आणि जर तुम्ही मदत केली नाही तर कोल्हापुरी चप्पल बुटांऐवजी कोकणची जनता नवाब मलिक तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. इतका संताप आज कोकणच्या जनतेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचं चित्र दिसत आहे."
मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही - मुख्यमंत्री
चक्रीवादळामुळे नुकसानीचे पंचनामे एक दोन दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर राज्यस्तरावर आढावा घेवून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल. चक्रीवादळामुळे ज्या ज्या घटकांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत दिली जाईल. कोळी बांधव, मच्छिमार व्यावसायिक यांच्यासह कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyclone, Nawab malik, Pravin darekar