News18 Lokmat

'गटारी' असल्यामुळे खड्डेभरणीचं काम बंद, आयुक्त गोविंद बोडके यांचं अजब वक्तव्य

केडीएमसीच्या आज झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला खड्ड्यांवरून धारेवर धरल्यानंतर त्यांनी हे विधान केलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2018 06:01 PM IST

'गटारी' असल्यामुळे खड्डेभरणीचं काम बंद, आयुक्त गोविंद बोडके यांचं अजब वक्तव्य

प्रदिप भणगे, कल्याण, 10 ऑगस्ट : आज गटारी असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत खड्डेभरणीचं काम बंद आहे, असं धक्कादायक आणि अजब विधान केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी केलं आहे. केडीएमसीच्या आज झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला खड्ड्यांवरून धारेवर धरल्यानंतर त्यांनी हे विधान केलं. कल्याण-डोंबिवलीत खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झाले असून आत्तापर्यंत पाच बळी गेले आहेत. यावरून केडीएमसीच्या मागच्या महासभेत प्रचंड गदारोळ झाला होता. शेवटी ही महासभा तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब महासभा आज पुन्हा सुरू झाली.

या सभेत पुन्हा एकदा सगळ्याच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत खड्डेभरणी सुरू नसल्याचा आरोप केला. त्यांना उत्तर देताना आयुक्तांनी आज गटारी असल्यानं काम बंद असल्याचं अजब आणि धक्कादायक कारण दिलं. महासभा तहकूब झाल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा हेच कारण देत अकलेचे तारे तोडले.

या महासभेत सत्ताधारी शिवसेनेनंही प्रशासनावर हल्ला चढवला. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना काम करण्याची इच्छाच राहिली नसून केवळ पाट्या टाकण्याची कामं होतायत, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केली. शिवाय यापुढे गळ्यात पाटी घालून सभागृहात येण्याचा इशाराही त्यांनी दिला.

तर महासभेत सुरवातीला विरोधी पक्षात असलेल्या मनसेनं सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. मागील सभेत राजदंड पळवणारे मनसे गटनेते प्रकाश भोईर यांचं महापौरांनी एका महासभेसाठी निलंबन करत असल्याची घोषणा केली, यावरून मनसेनं शिवसेनेला धारेवर धरत सभागृहात ठिय्या आंदोलन करणाऱ्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांचंही निलंबन करण्याची मागणी केली.

या सगळ्यांना उत्तर देताना आयुक्त गोविंद बोडके यांनी खड्डेभरणीचं काम सुरू असल्याचं सांगितलं, मात्र आज गटारी असल्यानं काम बंद असल्याचं अजब कारण देत त्यांनी नवीन वादाला तोंड फोडलं. आता गटारी हा काही राष्ट्रीय सण नाही, किंवा बँक हॉलिडेही नाही, हे बहुधा आयुक्त महोदय विसरले असावे. मात्र आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून असं बेजबाबदार विधान करण्यात आल्यानं कल्याणमध्ये गेलेल्या ५ बळींचं केडीएमसी प्रशासनाला गांभीर्य नसल्याचंच पाहायला मिळालं.

Loading...

गेले 8 दिवस बऱ्यापैकी उघडीक होती. तेव्हा खड्डे बुजवायाला पाहिजे होते. मात्र बुजवले गेले नाहीत. सत्ताधारी टॉम अँड जेरीचा खेळ खेळून नागरिकांना उल्लू बनवत आहे. आयुक्त असे बोलत असेल तर दुर्दैव आहे. असं मनसे गटनेते प्रकाश भोईर यांनी म्हटलं आहे.

अधिकारी गेंड्याचे कातडीचे झाले आहेत. अधिकाऱ्यांना काम करण्याची इच्छाच राहिली नसून केवळ पाट्या टाकण्याची कामं होतायत, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती द्यावी असं शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2018 06:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...