चेन्नई, 18 मे : 15 फूट उंचीचं स्वयंचलित भव्य स्लायडिंग गेट कोसळून झालेल्या दुर्घटनेत सोमवारी (17मे) चेन्नईतल्या (Chennai)इंटिग्रल कोच फॅक्टरीतला (Integral Coach Factory)एक इंजिनीअर आणि रेल्वे सुरक्षा दलाचा (Railway Protection Force)एक हवालदार यांचा चिरडून मृत्यू झाला.'दी न्यूज मिनिट'ने याबद्दलचंवृत्त दिलं आहे.
इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF)ही रेल्वेचे कोचेस म्हणजे डब्यांची निर्मिती करणारी भारतीय रेल्वेची (Indian Railway) फॅक्टरी आहे. या फॅक्टरीच्या आवाराला 15 फूट उंचीचं भव्य स्वयंचलित गेट आहे. रेल्वे सुरक्षा दलाचा काँस्टेबल एलाकुमानन हे गेट बंद करण्याचा प्रयत्न करत असताना गेटची चाकं त्यासाठी तयार करण्यात आलेल्या रुळावरून घसरली आणि ते गेट खाली कोसळलं. त्यावेळी फॅक्टरीत काम करणारा नकुलन नावाचा इंजिनीअरही तिथेच उभा होता. एलाकुमानन आणि नकुलन यांच्यावर हे गेट कोसळलं. त्या दोघांनीही हे गेट मागे ढकलण्याचा प्रयत्न केला; मात्र ते खूप वजनदार असल्यामुळे ते दोघेही या गेटखाली अक्षरशः चिरडले गेले. ही घटना फॅक्टरीच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.
घटनास्थळी असलेले अन्य सुरक्षारक्षक आणि अधिकारी तातडीने तिथे धावले आणि त्यांनी गेट उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्या दोघांनाही खूप जखमा झाल्या होत्या. त्या दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. नकुलन मृत झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. एला कुमाननचा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही वेळाने मृत्यू झाला.ICF पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणी तपास सुरू आहे.
TW: Two RPF workers die as gate collapses on them pic.twitter.com/7FOB8JBNza
— Bharathi S. P. (@aadhirabharathi) May 18, 2021
हे ही वाचा-VIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली
ICF मध्ये 9000हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. रेल्वेच्या डब्यांची निर्मिती करणारी ही जगातली सर्वांत मोठी फॅक्टरी आहे. गेल्या महिन्यात तमिळनाडूत कोविड-19च्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर 45 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना केवळ लस घेतली असल्यासच कामावर येण्याचे आदेश फॅक्टरीतर्फे देण्यात आले होते. सर्व कर्मचाऱ्यांना कोविड-19चे प्रोटोकॉल्स पाळण्याचे आदेशही देण्यात आले होते.
कुटुंबातल्या कोणालाही कोरोनाची लागण झाली असेल, तरी संबंधित कर्मचाऱ्याने फॅक्टरीत येऊ नये, असे आदेशही फॅक्टरीने दिले आहेत. कुटुंबीयाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांनी कामाला यावं, असं फॅक्टरीतर्फे सांगण्यात आलं होतं. कोविड-19 मुळे ICF चा कोणी कर्मचारी मृत्युमुखी पडला, तर तमिळनाडू सरकारतर्फे त्याचे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी संबंधित मृताच्या केवळ अगदी जवळच्या कुटुंबीयांनाच अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Live video