पालघर, 14 फेब्रुवारी : संपूर्ण जगभरात आज Valentine Day साजरा होत आहे. प्रत्येकजण आपल्या प्रेमाची कबुली देऊन सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत. अशात पालघरमध्ये आजच्या दिवशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघरमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे हिंगणघाटसारखा पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न टळला आहे. लग्न मोडल्याचा राग मनात धरून पेट्रोल आणून मुलीच्या आईला व तिच्या लहान बहिणीला जाळण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांनी हाणून पाडला आहे. हे दुष्कृत्य करण्याअगोदर पालघर पोलिसांनी गुरुवारी रात्री या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
भैरोसिंग राघूवीरसिंग राठोड (28) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यात पेट्रोल भरलेली बाटली आढळून आली. आरोपी राजस्थान-अजमेर परिसरातील असून तो येथे हे दुष्कृत्य करण्यासाठी पालघर येथे आला होता अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पालघरमधील राहणाऱ्या एका मुलीचे या आरोपीसोबत लग्न जमणार होते. त्यानंतर हा आरोपी काही काम करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी या लग्नाला नकार दिला. या मुलीने त्यानंतर दुसरीकडे लग्न केले. याचा राग मनात धरून आरोपीने मुलीच्या आईला व बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलीस तपासात आरोपीचे मोबाईल लोकेशन पालघरचे दिसत असल्याने पोलिसांनी रेल्वे स्थानकात सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
इतर बातम्या - तळपायाची आग मस्तकात जाईल... निर्भयाचे दोषी तुरुंगात करतायेत एन्जॉय
हिंगणघाटमधल्या जळीत प्रकरणाने सर्व राज्य हादरून गेलं होतं. मृत्यूशी झुंझ देणाऱ्या त्या पीडितेची लढाई सात दिवसानंतर संपली होती. नागपुरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही ती वाचू शकली नाही. या प्रकरणातला आरोपी विकेश नगराळे हा सध्या तुरुंगात आहे. त्याला या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांनी दिली तेव्हा त्याचा चेहेरा निर्विकार होता अशी माहिती समोर आलीय. त्यानंतर पोलिसांजवळ तो बोलताना त्याने प्रतिक्रिया दिली की, माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होत असेल तर मला गोळ्या घालून मारून टाका असं तो म्हणाल्याची माहिती समोर आली.
इतर बातम्या - 'हॉटेल नाही पण परमिट रुम चालते', गुलबराव पाटलांचा बेरोजगार तरुणांना अजब सल्ला
विकेशनेच हिंगणघाटमधल्या एका चौकात पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळलं होतं. त्यात ती 40 टक्के जळाली होती. या प्रकरणावर सर्व देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रसिद्ध वकिल उज्ज्वल निकम हे सरकारतर्फे पीडितेची बाजू मांडणार असून आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
इतर बातम्या - भीषण अपघात! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावरून खाली कोसळली कार