'राज्याला महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री मिळण्यापासून वाचवा', सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

'राज्याला महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री मिळण्यापासून वाचवा', सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता राज्यात सरकार स्थापनेसाठी कोण दावा करणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : विधानसभेच्या निकालानंतर वेळेत कोणत्याच पक्षाला सरकार स्थापन करण्यात न आल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार असं म्हटलं तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेची चर्चा होत आहे. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या या आघाडी म्हणजे सत्तेसाठी मतदारांची करण्यात आलेली फसवणूक घोषित करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

याचिकेमध्ये म्हटलं आहे की, शिवसेनेनं त्यांची भूमिका बदलली. हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये ठेवलेल्या विश्वासाचा घात आहे. या याचिकेवर पुढच्या काही दिवसांत सुनावणी व्हावी अशी आशा आहे. भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली. मात्र, निकालानंतर शिवसेनेनं वाट बदलली ही गोष्ट मतदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर दाखवलेल्या विश्वासाला तोडणारी असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

भाजपने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रण दिलं. त्यांना दिलेल्या वेळेत पाठिंब्याचं पत्र सादर करता आलं नाही. शेवटी राष्ट्रवादीलाही संधी दिली. त्यांनीही वेळ वाढवून मागितली मात्र राज्यपालांनी नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यावर मंगळवारी सायंकाळी शिक्कामोर्तब झाले.

जनहित याचिकेद्वारे प्रमोद पंडित जोशी यांनी महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री होण्यापासून वाचवण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्याला असा आदेश द्यावा की ज्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून मुख्यमंत्री नियुक्त होण्यापासून राज्याची सुटका व्हावी. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे हे कृत्य अनैतिक असून फक्त सत्तेसाठी धडपड सुरु आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात 17 नोव्हेंबरला दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेसोबत आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते असं म्हटलं जात आहे.

First published: November 15, 2019, 8:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading