उद्धव ठाकरे मला भेटले, पण आम्ही समविचारी पक्षांसोबतच जाऊ- शरद पवार

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मला भेटले, त्यांच्या बोलण्यातून ते भाजपवर नाराज असल्याचं जाणवलं पण आमच्यात भविष्यात एकत्र येण्यासंदर्भात राजकीय चर्चा झाली नाही, राष्ट्रवादी समविचारी पक्षांसोबतच जाणार, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलंय. नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाने अस्वस्थ असलेले उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटल्याने राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळताहेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2017 07:20 PM IST

उद्धव ठाकरे मला भेटले, पण आम्ही समविचारी पक्षांसोबतच जाऊ- शरद पवार

मुंबई, 07 नोव्हेंबर : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मला भेटले, त्यांच्या बोलण्यातून ते भाजपवर नाराज असल्याचं जाणवलं पण आमच्यात भविष्यात एकत्र येण्यासंदर्भात राजकीय चर्चा झाली नाही, राष्ट्रवादी समविचारी पक्षांसोबतच जाणार, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलंय. नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाने अस्वस्थ असलेले उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटल्याने राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळताहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यातलं भाजपचं सरकार पाडूही शकतात, अशा राजकीय चर्चेला उधाण आलंय कारण या तिन्ही पक्षांच्या आमदारांचं एकत्रित संख्याबळ 145 होतंय. आणि हे संख्याबळ बहुमतासाठी पुरेसं आहे. अशा सगळ्या शक्य शक्यतांवरच पत्रकारांनी आज थेट शरद पवारांनाच विचारलं त्यांनी हा खुलासा केलाय.

रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या दोन दिवशीय चिंतन शिबिराचा आज समारोप झाला. यावेळी शरद पवारांनी मोदी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करतानाच चक्क राहुल गांधींचं कौतुकही केलं. यावरून पवार सध्यातरी काँग्रेससोबतच राहू इच्छित असल्याचा कार्यकर्त्यांना संदेश देऊ इच्छित असल्याचं जाणवलं. गांधी घराणं हे काँग्रेसला एकत्र ठेवण्यात महत्वाचं आहे. राहुल गांधीकडे कौशल्य आहे. कष्ट करण्याची तयारी आहे फक्त त्यात त्यांनी सातत्य ठेवलं पाहीजे, अशी अपेक्षाही शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, प्रफुल पटेल यांच्या पंतप्रधानसंबंधीच्या वक्तव्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. ''प्रफुल्ल पटेलांनी काल कारण नसताना शरद पवार हे पुढचे प्रधानमंत्री होणार असा विषय काढला. हे सगळं डोक्यातून काढून टाका आणि पक्षासाठी काम करा, '' असा सज्जड दमच पवारांनी कार्यकर्त्यांना भरला. राष्ट्रवादीच्या महिला जेवढ्या रस्त्यावर उतरून आंदोलन करतायेत तेवढे पुरूष रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत. आपल्याला आता रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे,'' असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलंय.

राज्य सरकारच्या 3 वर्षपूर्तीनिमित्त भाजपने केलेल्या 'लाभार्थी' जाहिरातबाजीवरही शरद पवारांनी टीका केली. ''लाभार्थी...लाभार्थी...कसले लाभार्थी...जे सत्तेच्या खुर्चीवर बसलेयत तेच खरे लाभार्थी, जाहिरातींमध्ये सरकारनं लाभार्थी हा शब्द प्रयोग वापरून शेतकऱ्यांचा अपमान केलाय, असाही आरोप शरद पवारांनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...