पवनराजे खून प्रकरणाला नाट्यमय वळण, पद्मसिंह पाटलांच्या अडचणी वाढणार?

पवनराजे खून प्रकरणाला नाट्यमय वळण, पद्मसिंह पाटलांच्या अडचणी वाढणार?

या हत्याकांडाचा कोर्टासमोर खुलासा करणाऱ्या जैन याने माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

बालाजी निरफळ, उस्मानाबाद, 4 डिसेंबर : दिवंगत पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या खटल्यातील आरोपी पारसमल जैन याने मुंबई उच्च न्यायालयात माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. पवनराजे हत्याकांड सुनावणी अंतिम टप्प्यात असतानाच या हत्याकांडाचा कोर्टासमोर खुलासा करणाऱ्या जैन याने माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे.

पवनराजे हत्याकांडात राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील हे प्रमुख आरोपी असून जैन याच्या अर्जामुळे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या डॉ. पद्मसिंह पाटील या प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. आरोपी पारसमल याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केल्याने या खून प्रकरणात नवा खुलासा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोप जैनच्या या भूमिकेमुळे या खटल्यात नेमके काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काय आहे पवनराजे खून प्रकरण?

पद्मसिंह पाटील आणि पवनराजे हे चुलत बंधू सुरुवातीला एकत्र राजकारण करत होते. मात्र नंतरच्या काळात या दोन भावांमध्ये टोकाचे मतभेद झाले आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर डॉ. पाटील आणि पवनराजे यांच्यात उस्मानाबादमध्ये प्रचंड राजकीय संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली इथं पवनराजे यांची अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

पवनराजे आपल्या गाडीतून जात असताना दोन व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात पवनराजे आणि त्यांचे वाहनचालक या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक केली होती. नंतर पाटील यांना या प्रकरणात जामीन मिळाला.

दरम्यान, पाटील-पवनराजे संघर्षानंतर त्यांच्या दुसऱ्या पिढीतही हा राजकीय संघर्ष सुरू आहे. पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे आणि डॉ. पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह यांच्यात राजकीय संघर्षानं टोक गाठलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे विरुद्ध राणाजगजितसिंह यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत ओमराजेंना विजय खेचून आणला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 12:10 PM IST

ताज्या बातम्या