मुंबई, 20 मार्च : देशभरात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यात राज्यातील पुणे आणि नागपुरात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या परदेशातून येणाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. विदर्भातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता येथून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. मुंबईतील परेल, मुंबई सेंट्रल, बोरीवली, कुर्ला या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. विदर्भातून येणाऱ्या नागरिकांचीही तपासणी करण्यात येईल. त्यानुसार अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईत तपासणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारकडूनही वारंवार मास्क लावण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यामुळे दिल्ली, राजस्थान, गुजरात, केरळ, गोवा, विदर्भ येथून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईतील ठरावीत स्थानकांवर तपासणी केली जाणार आहे.
हे ही वाचा-नागपूरवरील संकट गडद; 24 तासांत 35 जणांचा मृत्यू, कोरोनाची धक्कादायक आकडेवारी
दरम्यान नागपूरमध्ये गेल्या 24 तासात 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3679 नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली. सध्या नागपूरमध्ये अॅक्टिव्ह केसेसचा आकडा हा 27 हजार 625 वर पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर आज कोरोना आढावा बैठकीत नागपूर पोलीस आयुक्तांनी जिल्हा हद्दीतील कठोर निर्बंध 31 मार्च पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. विदर्भात नवीन स्ट्रेन आहे का ? याबाबत तपासणी करण्यासाठी दिल्लीला विनंती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वर्ध्यातील एक महिला नागपूरच्या मनीष नगर भागात आली होती. त्यांची टेस्ट केली असता त्यांच्यात युरोपातील नव्या स्ट्रेनची लक्षणं दिसल्याचं प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मात्र नागपूरच्या नवीन स्ट्रेनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली असून यासंदर्भात तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.