गोपीनाथ गडावरील मेळाव्याच्या काही तासांपूर्वी पंकजा मुंडेंचं सूचक विधान!

गोपीनाथ गडावरील मेळाव्याच्या काही तासांपूर्वी पंकजा मुंडेंचं सूचक विधान!

'बॅनरवर कोणतेही चिन्ह लावण्याची गरज नाही. हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही. हा व्यक्तिगत कार्यक्रम आहे'

  • Share this:

बीड, 11 डिसेंबर : भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी उद्या  12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात त्या काय भूमिका मांडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं आहे. परंतु, त्याआधी 'ज्या राजकीय चर्चा रंगल्या आहे त्या सगळ्या चर्चांचं उत्तर उद्या मिळणार', असं सूचक विधान पंकजांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला.  निवडणुकीत झालेला पराभवाचा पंकजा यांना मोठा धक्का समजला जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजांनी फेसबुकवर पोस्ट करून  12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर सर्वांशी बोलायचं असं सांगून नाराज असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या या नाराजीमुळे पंकजा भाजपातून बाहेर पडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अखेर आता उद्या बुधवारी हा गोपीनाथ गडावर हा निर्णायक मेळावा होत आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या गोपीनाथगडावर येऊन दर्शन घेतले.  यावेळी पत्रकारांशी बोलताना पंकजा यांनी सांगितलं की, गोपीनाथ गडावर दरवर्षीप्रमाणे लोकं येत असतात. उद्या मी सुद्धा येणार आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक चर्चा रंगल्या आता त्या सर्व चर्चांना उत्तर उद्या मिळणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तसंच, शहरभरात पोस्टर्स लावण्यात आली असून या पोस्टर्सवर मात्र, काही ठिकाणी भाजपचे कमळाचे चिन्ह आहे तर काहीवर नाही. याबद्दल पंकजांना विरारले असता, 'बॅनरवर कोणतेही चिन्ह लावण्याची गरज नाही. हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही. हा व्यक्तिगत कार्यक्रम आहे. त्यामुळे बॅनरवर पक्षाचे चिन्ह लावले नाही. काही बॅनरवर कमळाचे चिन्ह आहे कारण, गोपीनाथ मुंडे आणि कमळाचं नातं आहे. त्यावर मी उद्या बोलणार आहे, असं पंकजांनी स्पष्ट केलं.

गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना मानणाऱ्या जनतेचे गोपीनाथ गडावर स्वागत आहे. तसंच उद्या गोपीनाथ गडावर कोण कोण येणार हे मी निश्चित सांगू शकत नाही. पण या मेळाव्याला अनेक नेत्यांनी आधीच येण्याबद्दल जाहीर केलं आहे. त्यानुसार, एकनाथ खडसे, महादेव जानकर, चंद्रकांत पाटील हे उद्या या मेळाव्याला हजर असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

Published by: sachin Salve
First published: December 11, 2019, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading