शारजाह, 4 ऑक्टोबर : क्विंटन डिकॉक (quinton dekock) चं अर्धशतक आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) , पांड्या बंधूंनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 208/5 पर्यंत मजल मारली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या मुंबई (Mumbai Indians) ची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एक सिक्स मारून माघारी परतला. तर यंदाच्या मोसमात संघर्ष करणारा क्विंटन डिकॉक पुन्हा फॉर्ममध्ये परतला. डिकॉकने 39 बॉलमध्ये 67 रनची खेळी केली. तर सूर्यकुमार यादव 18 बॉलमध्ये 33 आणि इशान किशन 23 बॉलमध्ये 31 रन करुन आऊट झाले. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने 19 बॉलमध्ये 28 रनची खेळी केली.
कायरन पोलार्डने 13 बॉलमध्ये नाबाद 25 रन केले. हार्दिक पांड्याची विकेट गेल्यानंतर बॅटिंगला आलेल्या कृणाल पांड्या (Krunal Pandya) ने 500 च्या स्ट्राईक रेटने 4 बॉलमध्ये 20 रन केले. कृणाल पांड्या शेवटच्या ओव्हरला तिसऱ्या बॉलला बॅटिंगसाठी आला होता. सिद्धार्थ कौलच्या बॉलिंगवर त्याने सिक्स, फोर, फोर आणि सिक्स अशी आतषबाजी केली. सिद्धार्थ कौलच्या या ओव्हरला एकूण 21 रन आल्या.
हैदराबादकडून सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्माला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर राशीद खानला 1 विकेट घेण्यात यश आलं. मुंबईला सुरुवातीला वारंवार धक्के बसल्यानंतर शारजाहच्या छोट्या मैदानात त्यांना 200 रनचा टप्पा गाठता येईल का? याबाबत प्रश्न निर्माण झाला होता, पण पोलार्ड आणि पांड्याने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला या धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं.