मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला

चर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली,ता.20 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहून चर्चेची इच्छा व्यक्त केली असा पाकिस्तानचा दावा भारतानं फेटाळून लावलाय. पकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आज इस्लामाबाद इथं बोलताना हा दावा केला होता. त्यानंतर परराष्ट्रमंत्रालयानं हा खुलासा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना पत्र लिहून सदिच्छा व्यक्त केल्या आणि दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सद्भावना राहावी अशी आशा व्यक्त केली. ही सदिच्छा व्यक्त करणं म्हणजे चर्चेचा प्रस्ताव नाही असं भारतानं स्पष्ट केलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी सुरू राहू शकत नाही असं सांगत भारतानं पाकिस्तानसोबतची चर्चा स्थगित केली होती. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादांना पाठिंबा देणं सुरूच ठेवेल तोपर्यंत चर्चा नाही अशी भारताची भूमिका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या आधीही अनेकदा जाहीर केली. त्यामुळे नव्याने चर्चेचा प्रस्ताव पाठवण्याचा प्रश्नच येत नाही असं परराष्ट्रमंत्रालयातर्फे सांगण्यात येतेय. असं असताना कुरेशी यांच्या सारख्या मुत्सद्याने केलेल्या दाव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या आधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होता. पुढच्या महिन्यात ताजिकिस्तानातल्या दुशांबे इथं होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जाणार असून इम्रान खानही तिथे येणार आहेत. त्या परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. इम्रान खान हे भारतासोबत निर्माण झालेली चर्चेची कोंडी फोडण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र अशी वक्तव्य होत राहिल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. साखरपुड्याच्या पार्टीनंतर निक निघाला अमेरिकेला, कॅमेऱ्यात कैद
First published:

Tags: India, Narendra modi, Pak pm Imran Khan, Pakistan, इम्रान खान, नरेंद्र मोदी, पाकिस्तान, भारत

पुढील बातम्या