पुणे, 8 डिसेंबर : पुणे जिल्ह्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. बाल निरीक्षक गृहात राहणारा अनाथ मुलगा शासना मध्ये अधिकारी बनला आहे. काही वर्षांपूर्वी अक्षर ओळख होण्यापूर्वीच अगदी लहान वयात बारामती येथील बाल सुधागृहात अनिल माणिक जाधव हा दाखल झाला होता.
अनाथ म्हणून बाल निरीक्षण गृह बारामती या ठिकाणी त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्याला कुणीही जवळचे नातेवाईक नव्हते. त्यामुळे बाल निरीक्षण गृहातील इतर साथीदार हेच त्याची भावंडं व बाल निरीक्षण गृहातील सर्व अधिकारी वर्ग हेच त्याचे पालक झाले.
त्याने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे आयटीआय पर्यंत शिक्षण घेतले. तसेच बारावी पूर्ण करून नंतर तो खासगी कंपनीत नोकरीला लागला. त्याठिकाणी त्याने एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. केवळ उच्च शिक्षण घेऊनच तो थांबला नाही तर कष्ट करत करत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणं सुरू ठेवलं आणि आज महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी(A.S.O.) मंत्रालय या ठिकाणी त्याची लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेली आहे.
आज सुशिक्षित पालक असणाऱ्यांची मुलं या इंटरनेटच्या जाळ्यात अडकून सोशल मीडिया अॅपमध्ये रात्रंदिवस डोके घालून खऱ्या शिक्षणापासून भरकटत आहेत आणि अनाथ अनिल जाधव यांनी कुणाचाही डोक्यावर हात नसताना आपुलकीची माया लावणारा कोणी नसताना आज शासनामध्ये एक उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. खरोखर ही गोष्ट समाजातील सर्व मुलांना आदर्शवत अशीच आहे.
हेही वाचा - 12 वी पास तरुणाची कमाल, भाजीपाला विकून झाला करोडपती, दिवसाला विकतो 90 हजारांचा माल
अनिल माणिक जाधव याला महाराष्ट्र शासनाने अनाथ प्रमाणपत्र महिला बालविकास खात्यामार्फत दिलेले आहे यावर्षीपासून अनाथांना सुद्धा शासनाच्या नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन देण्यात आलेले आहे. त्याचा लाभ अनिल माणिक जाधव याला झालेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baramati, Career, Mpsc examination, Success story