एकच पक्ष आणि 11 वेळा आमदार, ज्यांनी जिंकली प्रत्येक निवडणूक...

एकच पक्ष आणि 11 वेळा आमदार, ज्यांनी जिंकली प्रत्येक निवडणूक...

एकच पक्ष, एकच मतदारसंघ आणि एकच उमेदवार.. गणपतराव देशमुख महाराष्ट्रात असं उदाहरण दुर्मिळच आहे.

  • Share this:

पंढरपूर, 10 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिपस्तंभ म्हणून ज्यांची ओळख असली पाहिजे ते म्हणजे परंपरागत दुष्काळी सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांचं काम त्यांनी जवळून पाहिले आहे. एक व्यक्ती, एकच पक्ष आणि एकच मतदारसंघ आणि 11 वेळा आमदार हे उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळच आहे.

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. या माध्यमातून लोकांना न्याय देता देता त्यांची शेतकरी कामगार पक्षाशी काम करण्याची जवळीक झाली. 1950 पासून ते शेकापचे सक्रिय कार्यकर्ते झाले.

1962 साली गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली. पहिली निवडणूक लढवताना दुष्काळी सांगोल्यातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी लढाई सुरू केली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.

1972 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण दोन वर्षांतच झालेल्या पोटनिवडणुकीत गणपतराव पुन्हा निवडून आले ते सलग 1995 पर्यंत. याकाळात 1977 साली त्यांनी  महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभळले होते.

पुलोद काळात 1978 साली ते पहिल्यांदा राज्यमंत्री मंडळात सहभागी झाले. त्यानंतर 1999 साली पुन्हा मंत्री झाले. याकाळात त्यांनी दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कायम लढा दिला.  त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुष्काळी सांगोल्यात टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले.

1995 च्या पराभवानंतर गणपतराव देशमुख यांनी 1999  पुन्हा निवडून आले. 2014 पर्यंत त्यांनी 11 वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले. 2019 साली सुद्धा त्यांना निवडणूक लावण्याचा आग्रह समर्थ समर्थकांनी केला. पण 94 वर्ष असलेले वय तसेच शरीर साथ देत नसल्याने त्यांनी निवडणूक न लढवण्यावर ठाम राहत आपला निर्णय बदलला नाही.

एकच शेतकरी कामगार पक्ष, एकच मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि एकच उमेदवार गणपतराव देशमुख महाराष्ट्रात असं उदाहरण दुर्मिळच आहे. आजोबांपासून नातवाचेही मतदान गणपतराव यांना मिळाले आहे.  आयुष्यातील 50 वर्ष त्यांनी विधानसभेतील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे काम पाहिले. तसंच आपल्या कामाचा ठसा सुद्धा त्यांनी राज्यातील राजकारणात उमटवला.

आज सांगोल्यात गणपतराव देशमुख यांच्या 94 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम सुरू असले तरी भाई गणपतराव मात्र, फोन बंद करून एकांत आत्मचिंतन करत आहेत.

Published by: sachin Salve
First published: August 10, 2020, 4:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading