ओबीसींची 'क्रिमीलेयर' मर्यादा 8 लाखापर्यंत ; ओबीसी आरक्षणात उपप्रकारही पडणार !

ओबीसींची 'क्रिमीलेयर' मर्यादा 8 लाखापर्यंत ; ओबीसी आरक्षणात उपप्रकारही पडणार !

केंद्र सरकारने ओबीसींसाठी क्रिमीलेयर मर्यादा आता 8 लाखांपर्यंत वाढवलीय. यापूर्वी हीच मर्यादा 6 लाखांपर्यंत होती. तसंच ओबीसी प्रवर्गातल्या जातींचं यापुढे उपप्रकारांमध्ये वर्गीकरणही आयोगामार्फत करणार असल्याचं केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : केंद्र सरकारने ओबीसींसाठी क्रिमीलेयर मर्यादा आता 8 लाखांपर्यंत वाढवलीय. यापूर्वी हीच मर्यादा 6 लाखांपर्यंत होती. या निर्णयामुळे मागासवर्गातील 8 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांच्या पाल्यांनाही आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. वाढत्या महागाईमुळे ही क्रिमीलेयर मर्यादा 2 लाखांनी वाढवत असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाखो ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

आरणक्षाचे फायदे सर्व मागासवर्गीयांना न्याय हक्काने मिळावेत, यासाठी ओबीसी प्रवर्गातल्या जातींचं यापुढे उपप्रकारांमध्ये वर्गीकरणही आयोगामार्फत करणार असल्याचं केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केलंय. असं झालं तर ओबीसींमधल्याच छोट्या आणि दूर्लक्षित जातींनाही त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळू शकणार आहे. आजवर काही ठराविक जातीच आरक्षणाचा फायदा उचलताना आढळून आल्याचं दिसून आल्यानेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय.

दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र, हीच क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने तूर्तास 8 लाखांच्या आत वार्षिक आर्थिक उत्पन्न असणाऱ्यांनाच जातीय आरक्षणाचा नोकरी आणि शिक्षणामध्ये फायदा होणार असल्याचं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 05:02 PM IST

ताज्या बातम्या