05 डिसेंबर, मुंबई : मुंबई महानगरवरचा ओखी वादळाचा धोका आता टळला असून ते आता गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकलंय. त्यामुळे उद्या सूरतमधल्या सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार आहेत. तर अहमदाबादनजीकच्या 16 गावातल्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. ओखी वादळ आता गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावत असल्याने तिथल्या प्रशासनाकडून विशेष खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्यात.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सुरतमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुपारी तातडीची बैठक बोलावली होती. पावसाचं पाणी कुठेही तुंबून राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं रुपानी यांनी सांगितलं आहे. निवडणूक आयोगानंही निवडणूक अधिका-यांना आपातकालीन प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तर एनडीआरएफला तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या विविध भागात होणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उद्याच्या प्रचारसभा रद्द करण्यात आल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरतमधली सभा देखील रद्द करण्यात आली, राहुल गांधी यांच्याही उद्या गुजरातमध्ये 3 प्रचारसभा होणार होत्या पण वादळामुळे त्या देखील रद्द करण्यात आल्यात. अमित शहा यांचीही उद्याची प्रचारसभा रद्द करण्यात आलीय. त्यामुळे गुजरातच्या विधानसभा प्रचारालाही ओखी वादळाचा मोठा तडाखा बसलाय.
गुजरातमध्ये येत्या 9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होतंय. गुजरातवर ओखी वादळ घोंगावत असलं तरी ठरलेल्या वेळेनुसारच मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. गुजरातमधील परिस्थितीवर तिथलं प्रशासन बारीक लक्ष ठेऊन असून आम्ही त्यासंबंधीचे वेळोवेळी अपडेट्स घेत आहोत, असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा