मुख्यमंत्रिपद हवे असेल तर आमच्यासोबत या.. छगन भुजबळांची शिवसेनेला खुली ऑफर

लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची आठवणही करून दिली

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 07:38 PM IST

मुख्यमंत्रिपद हवे असेल तर आमच्यासोबत या.. छगन भुजबळांची शिवसेनेला खुली ऑफर

नाशिक,24 ऑक्टोबर:

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी युतीत आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा खुलासा करून सेनेच्या इशाऱ्यातून हवा काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. शिवसेना भाजपसोबत राहूनही मुख्यमंत्रिपद घेऊ शकते, आता ते शिवसेनेने ठरवायचे आहे, असेही भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. येवल्यातून छगन भुजबळ निवडून आले आहेत.

दरम्यान, निवडणुक निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले. मात्र आभार मानतानाच भाजपलाही त्यांनी टोले लगावले. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची आठवणही करून दिली. दोनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. पारदर्शकपणे चर्चा करतील आणि तोडगा काढतील असंही त्यांनी सांगितलं. आधी सत्तेचं वाटप ठरेल नंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा भाजपला इशारा नसून लोकसभेच्या वेळी जे ठरलं त्याची फक्त आठवण करून देतो असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, कुणाही एका व्यक्ती किंवा पक्षाभोवती प्रचार केंद्रीत राहू नये. जनतेनं अत्यंत जागरूकपणे मतदान केलंय. त्यांनी विरोधी पक्ष जिवंत ठेवलाय. काही जण गृहीत धरून चालतात त्यांनाही जनतेनं योग्य तो संदेश दिलाय असा टोलाही त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला. सत्ता स्थापनेही मला घाई नाही असंही त्यांनी सांगितलंय. भाजपने जागावाटपावेळी अडचण आहे म्हणून सांगितलं. मात्र प्रत्येकवेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. गरज पडली तर अमित शहाही चर्चेला येतील असंही ते म्हणाले.

Loading...

आदित्य ठाकरेंचा दणदणीत विजय

युवासेना अध्यक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. आदित्य ठाकरे यांना 70 हजार 191 मतांनी विजय झाला आहे. येथे आदित्य ठाकरे आणि आघाडीचे उमेदवार सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होती. तर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनीही थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दरम्यान, सुरेश माने यांना 15296 मतं तर बिचुकले यांना 647 मतं मिळाली आहेत.

निवडणुकीदरम्यान मुंबईतील वरळी मतदारसंघाची प्रचंड चर्चा होती. कारण, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली. कारण 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबातील कोणताही सदस्य कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नव्हता. यानिमित्तानं निवडणूक लढवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य ठरलेत. आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असल्याच्या घोषणेमुळे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आघाडी येथे आपला सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं जवळपास निश्चितच झालं होतं.

LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 07:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...