हुकूमशहाचं सीमोल्लंघन, सहा दशकांचं वैर संपणार?

हुकूमशहाचं सीमोल्लंघन, सहा दशकांचं वैर संपणार?

गेल्या 60 दशकांचं वैर विसरून किम जोंग उन याने दक्षिण कोरियात प्रेवश केला आणि दोन्ही देशांच्या संबंधात नव्या पर्वाला सुरवात झाली.

  • Share this:

सोल,ता.27 एप्रिल: सततचा संघर्ष,अण्वस्त्रांच्या हल्ल्याची धमकी आणि विखारी प्रचार, जोडीला टोकाचं वैर मागे सारत उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आज सीमा पार करून दक्षिण कोरियात आला आणि दोन्ही देशांच्या इतिहासात नव्या पर्वाला सुरवात झाली.

1953 नंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्यानं दक्षिण कोरियात प्रवेश केला आहे. ही ऐतिहासिक घटना मानली जातेय. काही महिन्यांपूर्वी दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिंम्पिक खेळासाठी उत्तर कोरियाचं पथक आणि त्याची लाडकी बहिण दक्षिण कोरियात आली होती, त्यानंतरच बर्फ वितळायला सुरूवात झाली.

किम जोंग उन आणि त्याच्या शिष्टमंडळाने आज दोन्ही देशांच्यामध्ये असलेल्या 'पनमुनजोन' या ठिकाणी प्रवेश केला. दोन्ही देशांदरम्यानच्या युद्धविरामाची ही जागा आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी किमचं स्वागत केलं. इथेच असलेल्या 'पीस हाऊस' इथं दोन्ही नेत्यांची आणि त्यांच्या शिष्टमंडळाची चर्चाही झाली.

चर्चेनंतर दोन्ही देशांनी संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध केलं असून अण्वस्त्र नि:शस्त्रिकरणासाठी काम करण्याचा निश्चय जाहीर केला आहे.

काय आहे संयुक्त जाहीरनाम्यात?

  • दक्षिण आणि उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त करणं
  • दोन्ही देशांदरम्यानचे तणावाचे सर्व मुद्दे निवळण्यासाठी प्रयत्न
  • दोन्ही देशांनी परस्परांविरूद्धचा जहरी प्रचार थांबवणं
  • विभाजनानंतर विभक्त झालेल्या दोन्ही देशातल्या नागरिकांना भेटीसाठी परवानगी देणं
  • दोन्ही देशांना रेल्वे आणि रस्ते मार्गानं जोडण्यासाठी प्रयत्न
  • यावर्षी होणाऱ्या आशियाई क्रिडा स्पर्धेत दोन्ही देशांचा एकच संघ सहभागी होणार

उत्तर कोरियातल्या गैसंग शहरात संयुक्त ऑफिस उघडण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. किम आणि मून जे इन यांनी 'पनमुनजोन' मध्ये वृक्षारोपणही केलं. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातल्या या शांतता चर्चेनंतर तणाव मोठ्या प्रमाणावर निवळला असून ही नव्या इतिहासाची सुरवात असल्याची प्रतिक्रिया किम जोंग उन यांनी तिथल्या नोंदवहित व्यक्त केली.

या घटनेनंतर किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जातंय. जगभर या घटनेचं स्वागत करण्यात येत असून जग एका मोठ्या संकटातून बचावलं अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

 

First published: April 27, 2018, 8:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading