प्योंगयाँग,ता. 24 मे: अण्वस्त्रबंदीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकत उत्तर कोरियानं आज पंग्गी-री हे अण्वस्त्रचाचणी केंद्र स्फोटांनी उद्धवस्त केलं. या कारवाईच्या वेळी निवडक 20 आंतरराष्ट्रीय पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.
दक्षिण कोरिया सोबत सुरू असलेली शांतता चर्चा आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची नियोजित बैठक यामुळं हुकूमशहा किम जोंग उन याने हा निर्णय घेतला आहे.
उत्तर कोरियातल्या उत्तर भागात असलेल्या पर्वत रांगांमध्ये पंग्गी-री हे अणुचाचणी केंद्र आहे. इथल्या पर्वतांच्या खाली असलेले दोन शक्तीशाली टनेल सहा स्फोटांनी उद्धवस्त करण्यात आले. यावेळी निवडक 20 आंतरराष्ट्रीय पत्रकार उपस्थित होते. या केंद्रात या आधी 6 अणुचाचण्या करण्यात आल्या होत्या.
या चाचण्या झाल्यानंतर हे केंद्र खिळखिळं झालं होतं. त्यामुळं ते केंद्र बंद झालं तरही उत्तर कोरियाला फारसा फरक पडणार नाही असं मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. अनेक देशांनी या निर्णयाचं स्वाग केलं आहे.