सोलापूर, 2 जानेवारी : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून गावपुढारी निवडणूक रणनीती आखण्यात मग्न आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात सध्या निमगाव (टें) या ग्रामपंचायतीचीच चर्चा आहे. कारण सलग 67 वर्ष ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडली जात असून यंदाही गावाने तीच परंपरा कायम ठेवली आहे.
निमगाव का ठरत आहे लक्षवेधी?
निमगाव टें गाव आर्थिक दृष्ट्या सधन असलेले गाव आहे. उजनी, सीना माढा योजनेच्या पाण्यामुळे या परिसरातील शेती समृद्ध झाली आहे. असं असलं तरी निमगाव व्यसनमुक्त झालं आहे. गावात ग्रामस्थांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. इयत्ता पहिलीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची सोय याठिकाणी केली आहे. गावात प्रत्येक कुटुंबाला प्रक्रिया केलेलं शुद्ध पाणी पुरवलं जातं.
गावातील प्रत्येक घरातील एक दोन व्यक्ती परिसरातील साखर कारखाना, बँक ,शाळा या ठिकाणी नोकरी करत आहे. आजपर्यंत तंटा नसलेलं आणि पोलीस स्टेशनला गुन्हा नसलेलं गाव म्हणून आपली ओळख निमगाव टें गावाने कायम ठेवली आहे. वडीलधारी मंडळींनी प्रत्येक वेळी नव्या पीढीतील तरूणांना गावच्या कारभारात काम करण्याची संधी दिली. गावच्या तरूण कारभारी मंडळींना आता आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात काम करायचं आहे.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणापासून जवळ वसलेल माढा तालुक्यातील निमगाव टें गाव. या गावाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दिवंगत आमदार विठ्ठलभाऊ शिंदे यांनी 1954 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तीच परंपरा आज 2021 मध्ये सुध्दा आमदार बबनराव शिंदे आणि संजयमामा शिंदे यांनी कायम ठेवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.