Elec-widget

शरद पवार ठरवणार राज्याचं भविष्य, काँग्रेसच्या नेत्यांसोबत घेणार बैठक

शरद पवार ठरवणार राज्याचं भविष्य, काँग्रेसच्या नेत्यांसोबत घेणार बैठक

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. असं असताना राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं होतं.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही 3 पक्षांचं बहुमत असणं महत्त्वाचं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. असं असताना राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं होतं. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे संपूर्ण 54 आमदार उपस्थित असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

सत्ता स्थापनेवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या अंतर्गत एक समिती नेमण्यात येणार असून ही समिती सत्ता स्थापनेवर निर्णय घेणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे अहमद पटेल , खरगे आणि वेणूगोपाल यांची यशवंतराव सेंटर इथे बैठक होणार असल्याची माहितीही नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रपती राजवटीसाठी राजभवनातून राष्ट्रपती शासनास कुठलीही शिफारस देण्यात आली नसल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

एकीकडे राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नाहीये. त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींमध्येच शिवसेनेने राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयाला कोर्टात आव्हान द्यायचं ठरवलं आहे. काँग्रेसचे नेते आणि वकील कपिल सिब्बल कोर्टात शिवसेनेची बाजू मांडतील, अशीही बातमी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न केला पण हा पाठिंबा मिळू न शकल्याने शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरला. आता मात्र काँग्रेसचेच नेते कपिल सिब्बल शिवसेनेच्या बाजूने कायदेशीर लढाई लढणार आहेत.

सत्तास्थापनेसाठी भाजपला 17 दिवस देण्यात आले तर शिवसेनेला मात्र 24 तासांची मुदत देण्यात आली. या निर्णयाविरुद्ध शिवसेना कायदेशीर लढाई लढेल, अशी शक्यता आहे. याबद्दल उद्धव ठाकरेंनी कपिल सिब्बल आणि अहमद पटेल यांच्याशी चर्चाही केली आहे.

मंत्रिमंडळाची बैठक

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी याबद्दल मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातल्या राष्ट्रपती राजवटीला गृहमंत्रालयाने हिरवा कंदिल दिलाय, अशीही माहिती आहे. कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ राज्यपालांची शिफारस स्वीकारतील, अशी चिन्हं आहेत. पंतप्रधानांच्या ब्राझील दौऱ्यापूर्वीच राष्ट्रपती राजवटीचा निर्णय होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com