नवी मुंबई 22 सप्टेंबर: राज्यात आणि मुंबईत कोरोना प्रकोप अजुनही कायम आहे. यातच श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा जीवघेणा कारभार समोर आला आहे. शहरातल्या हॉस्पिटल्सला गरज असताना आणि रुग्णसंख्या वाढल्यानंतरही महापालिकेने अद्याप व्हेंटिलेटर्सची खरेदी केली नसल्याचं उघड झालं आहे. शहरातला मृत्यूदर वाढत आहे, मात्र खरेदी प्रक्रिया लांबविली जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटर्सच्या खरेदीची प्रक्रिया रेंगाळली आहे. मर्जीतला ठेकेदार मिळावा यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रक्रिया लांबवली असल्याचा आरोप होत आहे.
क्रिटिकल कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्सची सर्वात जास्त गरज असते. अशा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जातो. मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पद्धतीने पुरवढा होत नाही त्यामुळे व्हेंटिलेटर्सची नितांत गरज असते.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मात्र या राज्याने घेतला शाळा सुरू होणार
नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्य सध्या 48 व्हेंटिलेटर्स आहेत. त्यातले 20 व्हेंटिलेटर्स हे महापालिकेला सरकारने काही दिवसांपूर्वीच दिले होते. तर सर्व खासगी हॉस्पिटल्सचे मिळून सध्या शहरात एकूण 121 व्हेंटिलेटर्स आहेत. आणखी किमान 50 व्हेंटिलेटर्सची गरज आहे. असं असतानाही खरेदी का केली जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
या खरेदी प्रक्रियेतच काही तरी संशयास्पद असल्याचं मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलंय. तर खरेदीची प्रक्रिया सुरू असून काम प्रगतीपथावर आहे असं सरकारी उत्तर महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलं आहे.
आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्या आमदार फंडातून अशा प्रकारच्या खरेदीसाठी प्रत्येकी 50 लाखांचा निधीही मंजूर झालेला आहे अशीही माहिती समोर आली आहे.
65 वर्षांपासूनचा कायदा बदलला, डाळी, तेल आणि कांदा आता ‘जीवनावश्यक वस्तू' नाहीत
नवी मुंबई महापालिकेचं साडेचार हजार कोटी रुपयांचं बजेट आहे. नागरिकांचे जीव जात असतानाही पालिकेला नेमकी कुठली अडचण आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे.