नवी मुंबई, 17 फेब्रुवारी : नवी मुंबईतून भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. भाजपच्या 4 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबईच्या राजकारणावर आणि महापालिकेवर गेली अनेक दशकं एकछत्री साम्राज्य गाजवणारे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपच्या 4 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका आयुक्त आणि सचिवांना राजीनामे सोपवले. नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यामुळे गणेश नाईकांना जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतल्या सर्व नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्ष ही राष्ट्रवादीची सत्ता आहे.
दरम्यान, नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. अगदी या अधिवेशनाच्या 24 तासांच्या आत भाजपच्या नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.
नाईक हे आपल्या सर्वच नगरसेवकांसह भाजपमध्ये आल्याने मुळ भाजपच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे. आपल्याला डावललं जातेय अशी त्यांची भावना असून त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे. नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांची गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत जवळीक होती. त्यांचा हा अघोषित शिवसेना प्रवेश मानला जात होता.
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले होते. तसेच तुर्भेमधील झोडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेही चांगलेच सक्रिय झाले आहेत. अशातच नगरसेवक फुटीची बातमी समोर आल्याने गणेश नाईक यांच्या अडचणी वाढू शकतात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Maharashtra, Shivsena