नाट्य संमेलनाचा समारोप : मुंबईत रंगभूमीचा इतिहास सांगणारं कलादालन उभारणार - उद्धव ठाकरे
नाट्य संमेलनाचा समारोप : मुंबईत रंगभूमीचा इतिहास सांगणारं कलादालन उभारणार - उद्धव ठाकरे
मुलुंड इथं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं आज सूप वाजलं. समारोप कार्यक्रमाला शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
मुंबई, 15 जून : मुलुंड इथं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं आज सूप वाजलं. समारोप कार्यक्रमाला शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
नाट्य संमेलनात पहिल्यांदाच सलग 60 तास विविध कार्यक्रम सादर करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. मराठी बाणा, संगीत सौभद्र, पंचरंगी पठ्ठेबापूराव, लोकककलांचा जागर, रंगबाजी असे सगळे कार्यक्रम या तीन दिवसांमध्ये सादर झाले. बालनाट्यांनी धमाल केली. आणि तीन दिवस प्रत्येक पहाट दिग्गजांच्या स्वरांनी सुरेल झाली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज ठाकरे आणि शरद पवार उपस्थित होते. तर समारोप उद्धव ठाकरेंच्या उपस्थित झाला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचं विमोचन करण्यात आलं.
काय म्हणाले नेतेउद्धव ठाकरे - कलाकार आणि नाटकांमुळेच माणसांचं जगणं समुद्ध झालं. राजकारणी हे उत्तम अभिनेते असतात, मात्र आज राजकारण्याचा मेकअप उतरवून एक रसिक म्हणून या कार्यक्रमाला आलो आहे. मुंबईत येणाऱ्या मराठी कलाकारांना राहण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे सोय करण्यात येईल. त्याचबरोबर गिरगाव चौपाटीवर मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं भव्य कलादालन उभारण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली.
सुशीलकुमार शिंदे - आम्ही देखील कधीतरी नाटकात काम केलं होतं फक्त आता राजकारणात आलो म्हणजे मंचावर येऊ नका असं म्हणणं चुकीचं आहे
राजकारणात कशी नाटक चालतात हे संजय राऊत ना विचारा..ते सामनातून काय बोलतात, उद्धव साहेबांच्या समोर काय बोलतात आणि मैदान मोकळं मिळालं तर काय बोलतात ते पाहिलं की वाटतं ते साधं काम नाही त्यासाठी नाटक अंगात असायला हवं
विनोद तावडे - नाट्यगृहांच्या दुरवस्था दूर करण्यासाठी विशेष फंड उभा करणार. 2 वर्षाचं टार्गेट ठेवून काम करू आणि मराठी रंगभूमी 7 दिवस प्रयोग करणारी रंगभूमी बनवू हे नाटय संमेलन थक्क करणारे आहे. नाटकात लागणारी भव्यता मराठी नाटकात आहे, गरज आहे ती योग्य दिशा मिळण्याची. रंगभूमी कामगारांसाठी मेडिक्लेमची योजना राबविण्यासाठी शासन पुढाकर घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.