नाशिक : तीन तासांनी थांबला बिबट्याचा थरार, याच परिसरात येण्याची वर्षातली तिसरी वेळ

नाशिक : तीन तासांनी थांबला बिबट्याचा थरार, याच परिसरात येण्याची वर्षातली तिसरी वेळ

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच पथक याठिकाणी दाखल झालं होतं. पण बिबट्या रहिवासी भागामध्ये पळत अशल्यामुळं त्याला पकडणं कठीण जात होतं.

  • Share this:

नाशिक, 18 एप्रिल : अखेर तीन तासांच्या थरारानंतर नाशिकच्या रहिवासी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला (Leopard in Nashik) पकडण्यात वनविभागाला यश आलं. गनच्या मदतीनं इजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर वनविभागाच्या पथकानं त्याला (Forest department catches leopard after 3 hours) ताब्यात घेतलं. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळं वनविभागाला या बिबट्याला पकडणं कठीण गेलं. यात वनविभागाचे एक अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.

(वाचा-500 कोटींची फसवणूक; कल्पतरु ग्रुपच्या फरार मालकाचा कोरोनामुळे मृत्यू)

खासदार भारती पवार यांचं निवासस्थान असलेल्या परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान काही नागरिकांना बिबट्या दिसला. त्यानंतर परिसरात एकच धावपळ सुरू झाली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच पथक याठिकाणी दाखल झालं होतं. पण बिबट्या रहिवासी भागामध्ये पळत असल्यामुळं त्याला पकडणं कठीण जात होतं. तसंच बिबट्याला पाहण्यासाठी म्हणून बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. पण काही वेळात पोलीस याठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर गर्दी कमी झाली.

गर्दी कमी झाल्यानंतर नरसिंह नगरजवळ चाणक्य अपार्टमेंट बिबट्या जात असताना त्याला गनच्या माध्यमातून भुलीचं इंजेक्शन देण्यात वनविभागाला यश आलं. त्यानंतर काही वेळात बिबट्या बेशुद्ध झाला आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. यादरम्यान वनक्षेत्रपाल प्रवीण भदाणे हे बिबट्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण तरीही सर्व नियम धाब्यावर बसवत नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पोलिसांची शक्ती ही गर्दी कमी करण्यातच खर्ची गेली.

(वाचा - ‘याला म्हणतात संवेदना जपणं’; मराठी दिग्दर्शकानं केलं राहुल गांधींचं कौतुक)

गेल्या वर्षभरात या भागात बिबट्या येण्याची ही तिसरी वेळ आहे. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजला जाणारा हा भाग आहे. गोदावरी नदीतीरावरील परिसर, सावरकर नगर, गंगापूर रोड या भागात भरदिवसा बिबट्या आढळणं ही चिंतेची बाब आहे. या भागात असलेली झाडी, वन विभागाची राखीव जागा आणि काही किलोमीटर जंगल असल्यानं इथं बिबट्यांच्या वावर सातत्यानं पाहायला मिळत आहे. त्यामुळं जंगलतोड थांबवून प्राण्यांचे अधिवास जपण्याची गरज वन्यजीवांच्या संवर्धनासाठी लढणारे व्यक्त करत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: April 18, 2021, 5:10 PM IST

ताज्या बातम्या