News18 Lokmat

नारायण राणेंच्या मनात चाललंय काय?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2017 08:12 PM IST

नारायण राणेंच्या मनात चाललंय काय?

28 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सध्या बंडाच्या पावित्र्यात आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजलीये. राणे कुठे जाणार ? काँग्रेसमध्येच भूकंप घडवणार की कमळ हातात घेणार अशा चर्चेचांना सध्या उधाण आलंय.

भूकंप सांगून होत नसतो असं वक्तव्य करणारे काँग्रेसचे आक्रमक नेते नारायण राणे सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. राणेंनी पक्षात बंडाचा झेंडा उभारल्यानं त्यांच्या दिल्ली भेटीकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. मात्र दिल्लीत राणेंचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे राणे दिल्लीत नेमकं काय करतायत याकडे सगळ्या राज्याचं लक्षं लागलंय. काँग्रेसचा पालिका आणि पंचायत निवडणूकीत झालेला दारूण पराभव....पक्षात मिळत नसलेलं महत्वा यामुळे नारायण राणेंनी आरपारच्या लढाईचं रणशींग फुंकलंय.

माजी खासदार निलेश राणेंनी तर अशोक चव्हाणांना थेट अंगावर घेत चौफेर हल्लाबोल केलाय.

नाराज राणे सगळ्यांच पक्षांना हवे हवेसे आहेत असं सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी राणेंच्या बंडाला हवा दिली. तर राणेंच्या भाजपप्रवेशाचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील असं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगत आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला.

राणे काँग्रेसमध्ये येवून आता एक तप पूर्ण झालं. त्यावेळी सहा महिन्यात मुख्यमंत्री करू असं आश्वासन दादांना देण्यात आलं होतं. मात्र ते आश्वासन पाळण्यात न आल्यानं तो घाव राणेंना जिव्हारी लागला. त्यामुळे या आधीही राणेंनी अनेकदा आपल्या खास स्टाईलनं काँग्रेस श्रेष्ठींसह राज्यातल्या अनेक नेत्यांना शिंगावर घेतलं होतं. त्यामुळे शिवसेनेतून आलले राणे काँग्रेस संस्कृतीत कधी मुरलेच नाहीत. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राणे कणकवलीत न जाता दिल्लीत तळ ठोकून आहेत. येत्या काळात ते कुणाची गुढी हाती धरतील याकडं सगळ्यांचं लक्षं लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 08:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...