मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आधी मुंबईत बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर - राणे

आधी मुंबईत बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर - राणे

मुंबई, ता.19 ऑक्टोबर : खासदार नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. गुरूवारच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले उद्धव ठाकरेंना मुंबईत बाळासाहेबांचं स्मारक बांधता आलं नाही. आधी त्यांनी बाळासाहेबांच स्मारक बांधावं आणि मग राम मंदिराविषयी बोलावं. निवडणुका आल्यामुळेच शिवसेनेला रामाची आठवण झाली अशी टीकाही त्यांनी केली.

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत भाजपला थेट आव्हान दिलं. येत्या 25 नोव्हेंबरपासून अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली होती. राम मंदिर बांधणार की नाही, हे भाजपने आधी सांगवे, त्यांना ते शक्य नसेल तर आम्ही राम मंदिर बांधू असही त्यांनी भाजपला सुनावलं होतं.

राणे म्हणाले, शिवसेनेला मुंबईच्या समस्या सोडवता आल्या नाहीत. शिवसेनेचे मंत्री केंद्रात सत्तेत आहेत. राज्यात सत्तेत आहेत मग त्यांनी एवढे दिवस राम मंदिराचा प्रश्न का उपस्थित केला नाही? एवढाच स्वाभिमान होता तर त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायचं होतं.

सरसंघचालक मोहन भागवत यांनीही उद्गार चिन्हांमध्ये न बोलता थेट सरकारला मंदिर बांधण्याचा आदेश दिला पाहिजे. हे करा, ते केलं पाहिजे, असं झालं पाहिजे असं बोलून काय फायदा असा सवालही त्यांनी केला.

उध्दव ठाकरे यांनी सभेसाठी लोकांची जमवाजमव केली.

शिवसेनेच्या यशात माझं कर्तृत्व शून्य आहे आणि हे कर्तृत्व बाळासाहेबांचं आहे हे उद्धव यांनी मान्य केलं ते बरं झालं असंही ते म्हणाले. दसरा मेळाव्यातलं उध्दव ठाकरे यांनी केललं भाषण म्हणजे किर्तनकार येऊन किर्तन करून गेल्यासारखं वाटलं अशी टीकाही त्यांनी केली.

VIDEO पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे

 

First published:

Tags: Narayan rane, Ram Mandir, Uddhav Thackery, उद्धव ठाकरे, नारायण राणे, राम मंदिर, सरसंघचालक