16 फेब्रुवारी, अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढल्याप्रकरणी भाजपचे उपमहापौर श्रीकांत छिंदम यांची अखेर भाजपातून हकालपट्टी करण्यात आलीय, उपमहापौर पदावरूनही त्यांना तात्काळ हटवण्यात आलंय. भाजपने प्रसिद्धीपत्रक जारी करून ही यासंबंधीची घोषणा केलीय. भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी फोनवरून बोलताना शिवजयंतीविषयी अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप व्हायरल होती. तसंच संबंधीत कर्मचाऱ्याने युनियनकडे तक्रारही केली होती. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच शिवसेनेनं छिंदम यांच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली आणि त्यांच्या कार्यालयाची मोडतोडही केलीय. शिवसेनेसोबतच संभाजी ब्रिगेडही छिंदम यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याने भाजपने शहरातलं वातावरण चिघळू नये, यासाठी छिंदम यांची तात्काळ उममहापौरपदावरून हकालपट्टी केलीय. स्वतः खासदार दिलीप गांधी यांनीच या कारवाईची माहिती दिलीय.
दरम्यान, या ऑडिओ क्लिपनंतर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. श्रीकांत छिंदम यांच्याविरोधात राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला, तर शिवसेनेनंही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेध केला आहे. या क्लिपमुळे शिवसेना आणि भाजपमधला अंतर्गत तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.