'क्राईम पेट्रोल' पाहून शिजला डोक्यात खुनाचा कट, सोनं लुटण्यासाठी वृद्ध महिलेचा घेतला जीव

'क्राईम पेट्रोल' पाहून शिजला डोक्यात खुनाचा कट, सोनं लुटण्यासाठी वृद्ध महिलेचा घेतला जीव

सोमनाथ याने नुकताच एक आयफोन, एक एअर कंडीशनर आणि होंडा शाईन मोटार सायकल अशा वस्तू हप्त्यावर घेतल्या होत्या.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 10 डिसेंबर : डोक्यावर कर्जाचं ओझं असलं की अतिरिक्त खर्चाला कात्री बसते. तर कधीकधी कर्ज आणि बँकेचा तगादा मागे लागल्यामुळे काही जण जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतात. मात्र, भिवंडीमध्ये कर्जबाजारी असलेल्या एका दाम्पत्याने आपल्याच शेजारी असलेल्या वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी महिलेनं 'सावधान इंडिया' आणि 'क्राईम पेट्रोल' पाहून हत्येचा कट रचला होता.

भिवंडी तालुक्यातील वडूनवघर या गावालगतच्या छोट्याशा तलावामध्ये एका अज्ञात वृद्ध महिलेचा तोंड बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि धक्कादायक माहितीसमोर आली.

पोलिसांनी सुरुवातील  विविध पोलीस ठाण्यांमध्ये मयत वृद्धेच्या वयोगटातील कोणी महिला बेपत्ता आहे किंवा कसे? याबाबत तपास केला असता सदरील मृत महिलेचे नाव सोनूबाई कृष्णा चौधरी ( ७० रा.चौधरपाडा )असे निष्पन्न झालं होतं. मयत वृद्धा ही २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताचे सुमारास तिच्या घरातून बेपत्ता झाल्याबाबत मृत वृद्धेचा मुलगा माणिक कृष्ण चौधरी याने पडघा पोलीस ठाण्यात खबर दाखल केली होती.

शेजारीच निघाले मारेकरी

त्यानंतर पोलिसांनी अधिकारीआणि पोलीस कर्मचाऱ्यांची ३ पथके तयार करुन वेगाने तपास सुरू केला. या गुन्ह्याच्या तपासामध्ये चौधरपाडा ते वडूनवघर या दरम्यानचे प्रत्येक सीसीटीव्ही फूटेज तसेच नागरिकांकडे कसून तपास करण्यात आला. त्यामध्ये मयताचे नातेवाईक आणि शेजारी राहणाऱ्या लोकांकडे तपास करीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक चेतन पाटील यांनी तांत्रिक विश्लेषनाद्वारे मृत वृद्धेच्या घरासमोरच राहणारा सोमनाथ रघुनाथ वाकडे ( ३५ ) याच्या हालचाली संशयास्पद असल्याबाबत माहिती मिळाली.  त्यांनी ही बातमी वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांना दिल्याने त्यांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या पथकांनी सोमनाथ वाकडे आणि त्याची पत्नी निलम वाकडे (३२ ) यांची कसून चौकशी केल्यानंतर या दोघांनी सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं.

कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी केला खून

सोमनाथ वाकडेवर मोठ्या प्रमाणावर कर्ज झालेले होते. तो स्वतः एका मुंबईतील इंजिनियरच्या कारवर चालक म्हणून नोकरी करीत असून निलम ही चौधरपाडा येथील शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. त्यांचे एकत्रित पगारातूनही घर खर्च नीट चालत नव्हता. त्यातच सोमनाथ याने नुकताच एक आयफोन, एक एअर कंडीशनर आणि होंडा शाईन मोटार सायकल अशा वस्तू हप्त्यावर घेतल्या होत्या. या तीनही वस्तूंचे हफ्ते थकल्यामुळे हफ्ते भरायचे कसे? या विवंचनेत दोघेही होते. मृत सोनूबाई हिला दरमहा १८ हजार रुपयांची पेन्शनची रक्कम मिळत होती. त्यातून तिने मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने करुन ते ती कायम जवळ बाळगत होती. ही बाब निलम हिला माहीत होती. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी जेवण झाल्यावर मयत सोनूबाई ही गप्पा मारण्यासाठी आरोपीत यांचे घरी आल्यावर तिच्या अंगावरील दागिने विकून पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी आरोपीत नीलम हिने कपडे धुण्याच्या धोपटण्याने सोनुबाई हिचे डोक्यात मारुन जीवे ठार मारले आणि आरोपीत सोमनाथ याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या ताब्यातील होंडा सीटी कारमधून मयत सोनूबाईचे प्रेत वडूनवघर येथील तलावात फेकून दिले.

आरोपी महिला पाहत होती क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया!

आरोपीत महिला ही क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया ही कार्यक्रम बघून तीने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितलं आहे.आरोपीत सोमनाथ वाकडे आणि नीलम वाकडे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचेकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक होंडा सीटी कार तसंच मयत सोनूबाई हिचे अंगावर असणारे सोन्याचे गंठण, चेन, मण्यांची माळ आणि एक कर्णफूल असे एकूण २ लाख ९०  हजार ५००रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून या दोघांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास एपीआय दिपक भोई करीत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 10, 2019, 9:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading