संतापजनक! मुंबईत भावाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आईकडून देहविक्रीसाठी जबरदस्ती

संतापजनक! मुंबईत भावाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आईकडून देहविक्रीसाठी जबरदस्ती

आरोपी आईने तिच्या अल्पवयीन मुलीचा एका युवकाशी विवाह लावला. पीडित मुलीचा नवरा शरीरसंबंधासाठी तिला रोज मारहाण करायचा.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : मुंबईमध्ये नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीवर बालात्कार केल्याच्या आरोपामध्ये सख्या भावासह 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये पीडित मुलीची आई आणि वडिलसुद्धा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली आईला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. पण मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर भावाने लहान बहिणीवर बलात्कार केल्यामुळे नात्याला काळिमा फासल्याचा हा प्रकार आहे.

आईने दलालाच्या मदतीने मुलीला विकलं

हे संपूर्ण प्रकरण मानखुर्द पोलीस स्टेशन परिसरातलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षी आरोपी आईने तिच्या अल्पवयीन मुलीचा एका युवकाशी विवाह लावला. पीडित मुलीचा नवरा शरीरसंबंधासाठी तिला रोज मारहाण करायचा. रोजच्या जाचाला कंटाळून मुलगी आईकडे गेली. या सगळ्याच्या काही दिवसानंतर आईने स्वत:च्या पोटच्या गोळ्याला एका दलालामार्फत विकलं.

इतर बातम्या - एसटी आणि कंटेनरच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताचे 'PHOTOS'

सख्या भावाने लहान बहिणीवर केला बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, दलालाने अल्पवयीन पीडित तरुणीला एका 60 वर्षाच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या भावाकडे मदत मागितली. पण यावेळीदेखील तिच्या पदरी नैराश्य आलं. संकटातून बाहेर काढण्याऐवजी भावानेच तिच्यावर बलात्कार केला. या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. तर पोलीस सध्या 60 वर्षाच्या व्यक्तीचा शोध घेत आहे.

अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं. यामध्ये पीडित मुलीचे आई-बाबा आणि तिचा भाऊ आहे. पोलीस आता या तिघांचा कसून तपास करत आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांतर्गत बलात्कार आणि अप्राकृतिक लैंगिक अपराधापासून संरक्षण (पीओसीएसओ) कायदा, अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायदा (पीआयटीए) कायदा आणि बाल विवाह प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू, इतर टॉप 18 बातम्या

Published by: Renuka Dhaybar
First published: August 19, 2019, 10:30 AM IST

ताज्या बातम्या