#MumbaiRainlive: मुंबईकरांनो, धोका अजून टळला नाही; हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

#MumbaiRainlive: मुंबईकरांनो, धोका अजून टळला नाही; हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

दुपारनंतर पाऊस जरा ओसरला असला तरी पुढच्या 48 तासांत मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अख्खी मुंबई आता पाण्यात गेली असं म्हणायला हरकत नाही. आजही पावसामुळे मुंबई, नवी मुंबईसह पुण्यातही पावसाने तुफान बॅटिंग केली. दुपारनंतर पाऊस जरा ओसरला असला तरी पुढच्या 48 तासांत मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

जोरदार पावसामुळे जागोजागी पाणी साचलं आहे तर अनेक ठिकाणी झाडं किंवा भिंत कोसळून मोठी जीवितहानी झाली आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अवघ्या 12 तासांत महाराष्ट्रात 29 जणांचा मृत्यू झाला. त्यात जागोजागी वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशात हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार, आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.

पुढच्या 48 तासामध्ये मुंबईसह अनेक उपनगरांत त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे जीवितहानी वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे समुद्रावर किंवा कोणत्याही टेकड्यांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

रेल्वेचे तीनही मार्ग पावसामुळे खोळंबले...

मुंबईमध्ये अनेक सखल भागात अजूनही पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सीएसएमटी ते ठाणेदरम्यान मध्य रेल्वे अजूनही ठप्प आहे. ठाण्याच्या पुढे बदलापूर, कर्जत, कसाऱ्याकडे लोकल सोडल्या जात आहेत. पण ठाण्यापुढे जाण्यासाठी तूर्तास तरी रेल्वे मार्ग उपलब्द नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

हार्बर रेल्वे सीएसएमटी ते वांद्रे या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. पण सीएसएमटी ते मानखुर्द वाहतूक अजूनही बंद आहे. सीएसएमटीकडून 3 विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. कर्जत, कसारा आणि बदलापूरसाठी या ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.

पावसामुळे किंग्स सर्कल, सायन, माटुंगा, जुहू, वांद्रे परिसरात पाणीच पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. गेले काही दिवस मुंबईत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या तलावांमध्येही पाण्याच्या पातळीत वाढ होतं आहे. मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागलं आहे. पवई तलावाचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही. मात्र, पवई तलाव भरून वाहू लागल्यामुळे मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.

हवामानातल्या बदलामुळे मुंबईकरांवर पावसाची आपत्ती - आदित्य ठाकरे

गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांना पावसाने झोडपलं. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. अशातच आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाची पाहणी केली. त्यांनतर वरळीमधील पंपिंग हाऊसचाही आढावा घेतला. हवामानातल्या बदलामुळे मुंबईकरांवर पावसाची आपत्ती आल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. बीएमसीतल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी केल्यानंतर आदित्य यांनी हवामानावर खापर फोडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2019 02:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading