मुंबई, 10 फेब्रुवारी : पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे आणि कल्याण-कसारा या मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी साडे चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टीदरम्यान सकाळी साडे अकरा ते संध्याकाळी सव्वा चारपर्यंत एकही ट्रेन धावणार नाही.
दुसरीकडे सीएसएमटी ते पनवेलकडे जाणाऱ्या लोकलही सकाळी साडे अकरा पासून दुपारी साडे चारपर्यंत रद्द करण्यात आल्यात. यासोबतच कल्याण-कसारा मार्गावर शहाडच्या पादचारी पुलाच्या कामासाठी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत लोकलसेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
आज रविवारी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ काम करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मनमाड इथून सुटणारी राज्यराणी आणि गोदावरी एक्स्प्रेससह मुंबईकडे जाणाऱ्या आणि परतणाऱ्या 9 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ दुरुस्तीचे काम करण्यासाठी रविवारी सकाळी 10.45 ते दुपारी 2 वाजेपर्यंच मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मनमाड-मुंबई, मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला, कुर्ला-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, कल्याण मार्गे जाणारी भुसावळ-पुणे, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, जालना-मुंबई, मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस आणि भुसावळ-मुंबई पैसेंजर या 9 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
तर मेगाब्लॉकमुळे काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली असून मेगा ब्लॉकमुळे उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता ही रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.
VIDEO : अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या टपरीवाल्याला अश्रू अनावर