मुर्दाड, निबर आणि कुचकामी

मुर्दाड, निबर आणि कुचकामी

दोष पुन्हा अस्तित्वात नसलेल्या यंत्रणेचा, अर्थात सिस्टमचा आणि सिस्टमचाच आहे. सगळ्याचं मूळ कारण परिणामकेंद्रीत असण्याऐवजी व्यक्तिकेंद्रीत यंत्रणा आहे.

  • Share this:

 अमेय चुंभळे,

सोमवारी 17 डिसेंबरल मुंबईच्या मरोळ भागात ESIS हॉस्पिटलमध्ये आग लागली, 11 जण पृथ्वीमुक्त झाले, 140 पेक्षा अधिक जखमी. (नेहमीप्रमाणं) धक्कादायक गोष्ट अशी की एकच आठवड्यापूर्वी अग्निशमन विभागानं हॉस्पिटलमधील अग्निशामक यंत्रणा अपुरी आणि कुचकामी असल्याचं जाहीर केलं होतं. इथेच मेख आहे. फक्त अहवाल दिला, कारवाई कोण करणार ? जर्मन सरकार ?

काही जण मला सारखं तेच बोलतो म्हणून ब्लेम करतील. पण इलाज नाही. दोष पुन्हा अस्तित्वात नसलेल्या यंत्रणेचा, अर्थात सिस्टमचा आणि सिस्टमचाच आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील आणि आपात्कालीन सेवा देणाऱ्या इमारतीत जर अग्निशामक यंत्रणेची ही परिस्थिती आढळली, तर ती त्वरित दुरुस्त व्हावी, याची खबरदारी घेणारी यंत्रणा १३० कोटींच्या देशात असू नये ? अरे कोडग्यांनो, रुग्ण असतात तिथे. ते आजारी आहेत म्हणून तिथे दाखल झालेत. किमान त्यांच्याकडून तरी आग लागल्यावर धावायची अपेक्षा ठेवू नका.

एल्फिन्स्टन रोडची चेंगराचेंगरी असो किंवा अमृतसरची रेल्वे दुर्घटना; सगळ्याचं मूळ कारण परिणामकेंद्रीत असण्याऐवजी व्यक्तिकेंद्रीत यंत्रणा. म्हणजे... ठाण्याचा विकास करण्यासाठी आम्हाला टी. चंद्रशेखर लागतात, निवडणूक सुधारणांसाठी टी. एन. सेशन लागतात, मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंसारखे मिळाले तर लोक खूश होतात... पण चंद्रशेखर किंवा मुंढे हे अपवाद असतात म्हणून लोकप्रिय होतात. सगळीकडे सिस्टम तशीच पाहिजे. आणि पाहिजेच.

पण आपल्याकडील यंत्रणा एका व्यक्तिला खूश करण्यामागे लागलेल्या असतात. त्या यंत्रणा कशासाठी बनवल्या गेल्या आहेत, याचा विसर पडतो. जगात फक्त तेच देश प्रगत मानले जातात, किंबहुना प्रगत बनू शकतात, जिथे यंत्रणा सक्षम असतात. उदा. अमेरिका आणि युरोप.

डोनाल्ड ट्रम्प ही व्यक्ती वादग्रस्त. अनेकांच्या मते बिनडोक. पण ट्रम्प सत्तेत आल्यावरही तिथले सिग्नल नीट चालतायेत, आणि लोक ते पाळतायेत. सरकारी योजना कोसळल्या नाहीत, की भ्रष्ट झाल्या नाहीत, केवळ ट्रम्प आले म्हणून. याचं कारण तिथल्या सिस्टममधील प्रतिकारशक्ती. इंग्रजीत ज्याला इम्यून पॉवर म्हणतात. तिथली सिस्टम नेत्याकडून येणारे धक्के आणि कुरघोड्या पेलू शकते. परतवून लावू शकतात. इच्छा असली तरी ट्रम्प महाशय तिथल्या मुलभूत नियमांना हात लावू शकत नाहीत. आणि भारतात ?

मी जिथे राहतो, त्या मुलुंड पूर्व भागातील एक नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे. भाजपचे. हल्ली मी फुटपाथवर पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो ट्विट करतो, काही तासांत वाहतूक पोलिसांकडून दंड ठोठावल्याचं उत्तर येतं. गेल्या महिन्याभरापासून गंगाधरेंच्या २ गाड्यांचे फोटो ट्विट करत आहे. पण पोलीस नगरसेवक साहेबांच्या घरी चलान पाठवण्यास धजावत नाहीयेत. कारण ? पोलीस यंत्रणेच्या कामात राजकारण्यांना सहज करता येणारा हस्तक्षेप. म्हणून म्हटलं, अमेरिकेतलीच यंत्रणा राजकारण्यांचे हल्ले पचवू शकते.

आपल्या तथाकथित महान देशात काही बदलेल याची आशा मी आता सोडून दिलेली आहे. आणि मला, ‘आयएएस का नाही झालास मग..’ वगैरे सल्ले देऊ नका. मला नव्हतं जायचं प्रशासनात. अमेरिका किंवा जर्मनीतले सर्व नागरिक आयएएस असतात काय ? माझ्या देशातली यंत्रणा मुर्दाड आहे, निबर आहे, कुचकामी आहे. जोपर्यंत त्यातील इंग्रजकालीन माज काढला जात नाही, तोपर्यंत आगीत, चेंगराचेंगरीत, रस्ते अपघातात, विषबाधेमुळे, इमारत पडल्यामुळे, चुकीच्या उपचारांमुळे.... जिवंतांचं रुपांतर प्रेतांमध्ये होतच राहणार. आपला नंबर लागेपर्यंत मजा करून घ्यायची, इतकंच.

First published: December 23, 2018, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading