PMC बँक घोटाळ्यात 8वा मृत्यू, उपचारासाठी पैसे न मिळाल्याने तणावामुळे गेला जीव

अलीकडेच आरबीआयने बँकेच्या ग्राहकांसाठी रोख रक्कम काढण्याची कमाल मर्यादा 25,000 रुपयांवरून 40,000 रुपयांपर्यंत वाढविली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 10:26 PM IST

PMC बँक घोटाळ्यात 8वा मृत्यू, उपचारासाठी पैसे न मिळाल्याने तणावामुळे गेला जीव

मुंबई, 04 नोव्हेंबर : महाराष्ट्रात झालेल्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी 8व्या खातेधारकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एंड्रयू लोबो नावाच्या एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एंड्रयू यांच्यावर उपचार सुरू होते. पण पैसे न मिळण्याच्या भीतीमुळे ते तणावात होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या मंगळवारी कुलदीप कौर विज (64) यांचे नवी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यापूर्वी फट्टोमल पंजाबी, संजय गुलाटी, मुरलीधर धरा यांच्यासह भारती सदरंगानी नावाच्या वृद्ध महिलेचादेखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 खातेदारांचा मृत्यू झाला आहे.

पीएमसी खात्यातून काढू शकतात 1 लाख रुपये

अलीकडेच आरबीआयने बँकेच्या ग्राहकांसाठी रोख रक्कम काढण्याची कमाल मर्यादा 25,000 रुपयांवरून 40,000 रुपयांपर्यंत वाढविली आहे. आता काही विशेष प्रकरणांमध्ये आरबीआयने 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याची तरतूद केली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 1 लाखांपर्यंत पैसे काढणे शक्य आहे. त्याचबरोबर विवाह, ज्येष्ठ नागरिक, शिक्षण आणि अपंग लोकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपये केली आहे.

दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्यात गेल्या काही दिवसांआधी धक्कादायक माहिती समोर आली होती. बँकेच्या नोंदीत 10.5 कोटींची नोंद नसल्याचं तपास पथकानं म्हटलं. एचडीआयएल आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी दिलेले धनादेश पथकाच्या हाती लागले. विशेष म्हणजे हे धनादेश कधीच बँकेत जमा न करता रोख रक्कम देण्यात आली. त्याशिवाय हा घोटाळा 4 हजार 355 कोटी रुपयांचा नसून तब्बल 6 हजार 500 कोटींचा असल्याचंही समोर आलं.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याची तपासणी करणाऱ्या पथकाला मिळालेल्या धनादेशांची एकूण किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच अंदाजे 50 लाख रुपयांचा हिशोब नाही. याशिवाय बँकेतील घोटाळ्याची रक्कम 2 हजार कोटींनी वाढली आहे. आता ती 6 हजार 500 कोटी रुपये इतकी झाली.

Loading...

आरबीआयने नियुक्त केलेले अधिकाऱ्यांच्या आदेशावरून बँकेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे. यामध्ये बँकेच्या रेकॉर्डवरून 10.5 कोटी गहाळ झाले असल्याचं दिसत आहे. तसेच तपासणी करत असताना घोटाळ्याची रक्कमही जास्त असल्याचं दिसून आलं.

एडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना धनादेश पाठवले. त्यानंतर थॉमस यांनी धनादेश बँकेत जमा न करताच रोख रक्कम दिली. बँकेच्या रेकॉर्ड बुकमध्येही त्याबाबतची नोंद नाही. थॉमस यांनी 50 ते 55 लाख रुपये स्वत:कडे ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पीएमसी घोटाळ्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये थॉमस यांच्यासह एचडीआयएल आणि त्याचे संचालक राकेश आणि सारंग वर्धवन यांना अटक झाली आहे. दरम्यान, कर्जाच्या घोटाळ्याची रक्कम 4 हजार 355 वरून 6 हजार 500 कोटी रुपयांवर पोहचल्यानं एफआयआरमध्ये अफरातफरीचं कलम जोडलं जाण्याची शक्यता आहे.

न्यायालयानं गुरुवारी पीएमसी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तर मुंबईतील सीएमएम कोर्टानं माजी संचालक एस सुरजित सिंह अरोरा यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बुधवारी अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 10:26 PM IST

ताज्या बातम्या