मुंबई, 25 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे कोविड प्रकरणातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत (Mumbai) ओमायक्रॉनचे 20 रुग्ण आढळून आलेत. मुंबईत पालिकेनं (BMC) सावध पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत बाजारात दररोज बाहेरून येणाऱ्या 7 ते 10 हजार ग्राहकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्कसोबतच (Mask) सोशल डिस्टन्सिंगकडेही (social distance) पूर्ण लक्ष दिले जात आहे.
कोविडचा वाढता संसर्ग पाहता दक्षिण मध्य मुंबईतील प्रसिद्ध 160 वर्षे जुन्या भायखळा भाजी मंडईने मोठा निर्णय घेतला आहे. भाजी मार्केटमध्ये मास्कशिवाय येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला भाजीपाला दिला जाणार नसल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज 7 ते 10 हजार ग्राहकांना भाजीपाला विकणाऱ्या या भायखळा भाजी मंडईतील घाऊक व्यापाऱ्यांनी आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मुंबई ठरतेय हॉटस्पॉट
काल राज्यभरात ओमायक्रॉनचे 20 रुग्ण (Omicron patients) आढळले आहे. मुंबईमध्ये (mumbai) सर्वाधिक 11 तर पुण्यात 6 रुग्ण आढळले आहे. राज्यात आता 108 रुग्णांनी टप्पा गाठला आहे. राज्य आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईमध्ये एकूण 11 रुग्ण आढळले आहे.
BMC आयुक्तांनी जारी केले आदेश
कोविड-19 ची वाढती प्रकरणे लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC commissioner) यांनी नवीन वर्षाच्या पार्टीवर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. यामध्ये खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश 25 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पासून लागू करण्यात आला आहे. बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या आदेशानुसार, कोरोनाबाबतच्या या आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आयपीसी कलम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. हा नवा आदेश राज्य सरकारच्या आदेशाव्यतिरिक्त आहे.
राज्य सरकारची नवी नियमावली
1) संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
2) लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
3) इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
4) उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
हेही वाचा- वाह..! दहशतवाद्यांविरोधात शोपियानमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई
5) क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
6) वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
7) उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
8) याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
हेही वाचा- IT चा सर्वात मोठा छापा, अत्तर व्यापाऱ्याच्या घरात सापडलं 177 कोटींचं घबाड
9) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.